देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक पक्ष व नेते प्रचार कार्यात गुंतले आहेत. लोकसभेचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडणार असून याला केवळ १५ दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार मोहीम वेग घेत आहेत. राज्यातील २-३ मतदारसंघ वगळता जवळपास सर्व जागांवर उमेदवार जाहीर झालेले असून प्रचाराचे नारळही फुटत आहेत. काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमधील भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्या प्रचाराचा नारळ फोडला.
अशोक चव्हाण यांचे नाव भाजपच्या स्टार प्रचारक यादीत असल्याने त्यांच्या राज्यात अनेक सभा होणार आहेत. नांदेडमध्ये पहिल्याच प्रचार सभेत अशोक चव्हाण यांनी केलेल्या डायलॉगबाजीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. जो मैं बोलता हूँ, वह करता हूँ, असा फिल्मी डायलॉग मारला. त्यांच्या रावडी अंदाजाची सभास्थळी चर्चा सुरू होती.
नांदेडमधील सभेत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपमधील जुने लोक आणि काँग्रेसमधून आज भाजपामध्ये सहभागी झालेले लोक आहेत. त्यामुळे आता आपली ताकद डबल होणार आहे. ताकद डबल होणार म्हणजे किसी को देखने की जरुरत नहीं है. प्रतापराव और हम अलग अलग थे. ७ से १० साल से वो मुझे और मै उन्हे पानी में देखते थे. अब हम दोनो एकसाथ आ गए. अशोक चव्हाण की आदत ऐसी नहीं की सामने एक और पिछे एक. जो मैं बोलता हूँ, वो करके दिखाता हूँ. मग ते विकासाचं काम असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा आत्महत्याग्रस्तांचे प्रश्न असो, अशी डॉयलॉगबाजी अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. मी आश्वासन पाळणारा माणूस आहे असंही चव्हाण म्हणाले.
दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे. ज्या काँग्रेस पक्षाच्या नावावर तुम्ही, तुमच्या कुटुंबाने राजयोग भोगलं, ज्या काँग्रेस पक्षात राहून पैसे कमावले, मोठ-मोठी पदे भूषवली, अशी काँग्रेस नावाच्या आईने तुम्हाला मोठं केलं त्याच आईची तुम्ही बदनामी करता, याचा तुम्हाला अधिकार नाही. तुमच्या या कृतीबद्दल लोकं तुम्हाला माफ करणार नाहीत. एकंदरीतच अशोक चव्हाण यांना महाराष्ट्रातून काँग्रेस संपवायची होती. पक्षाला संपवण्याचा त्यांनी प्लॅन बनवला होता, असा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला आहे