Lok Sabha Election 2024: पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत अखिल भारतीय काँग्रेस समितीने मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीचं पत्र जारी करण्यात आले. या पत्रात संजय निरुपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून केल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रदेश काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचे नावही काढून टाकण्यात आले आहे. यावर संजय निरूपम यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काही वेळातच यासंदर्भात सविस्तर माहिती देईन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय निरुपम यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यात असे म्हटले आहे की, “पक्षाला काल रात्री माझा राजीनामा मिळाल्यानंतर त्यांनी माझी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. अशी तत्परता पाहून आनंद झाला. फक्त माहिती शेअर करीत आहे. मी या संदर्भात आज सकाळी ११.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत या वेळत सविस्तर बोलेन.”
माजी खासदार संजय निरुपम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.संजय निरुपम हे आगामी लोकसभा निवडणूक मुंबई मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे.जी त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑफर केली जाण्याची शक्यता आहे.संजय निरुपम यांना उत्तर-पश्चिम मुंबईमतदारसंघातून निवडणूक लढवायची होती, पण काँग्रेसचा मित्रपक्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली. भाजप-शिवसेना युतीने अद्याप या मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.
संजय निरुपम हे आधी शिवसेनेत होते आणि नंतर त्यांनी २००५ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण शिंदे सेनेचे गजानन कीर्तीकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.
पक्षातून हकालपट्टी होण्यापूर्वी राज्यसभेचे माजी खासदार संजय निरुपम यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर काँग्रेसने बुधवारी रात्री बेशिस्तपणा आणि पक्षविरोधी वक्तव्यांचे कारण देत निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकृत आदेश जारी केला.
संबंधित बातम्या