Amravati Lok Sabha Constituency News: आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच देशातील अनेक पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आपपल्या मतदारसंघातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार अनेक अश्वासन देऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे. नवनीत राणा यांनी मतदारांना १७ रुपये किमतीच्या साड्या वाटून मेळघाटची बेईज्जती केली, अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.
भाजपने नवनीत राणा यांना अमरावती मतदार संघातून उमेदवारी घोषित केली. परंतु, त्यांच्या उमेदवारीला महायुतीत असलेले बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला. यानंतर बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. अमरावतीत नवनीत राणा आणि दिनेश बुब यांच्यात राजकीय लढत सुरू असताना बच्चू कडू यांनी नवा मुद्दा उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी मेळघाट येथील अदिवासी महिलांना साड्या वाटल्या. मात्र, या साड्या निकृष्ट दर्जाच्या असून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना बच्चू कडू म्हणाले की, दोन कोटींच्या वाहनातून फिरायचे आणि १७ रुपयांची साडी वाटायची, हे बरे नव्हे, असे बच्चू कडू म्हणाले.
दरवर्षी मेळघाटात होळी सणाच्या निमित्ताने नवनीत राणा यांच्याकडून आदिवासी महिलांना साडी वाटप, किराणा वाटप केले जाते. यावर्षीही महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. परंतु, काही गावांमध्ये महिलांना निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. नवनीत राणा यांनी वाटप केलेल्या साड्यांबाबत तक्रारी येताच बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीकास्त्र सोडले.
स्थानिक कापड व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरतमधील घाऊक बाजारात मोठ्या संख्येने साड्या खरेदी केल्यास त्या अत्यंत कमी किंमतीत मिळतात. नागरिकांना अवघ्या तीस ते चाळीस रुपयांम्ध्ये घरगुती वापराच्या साड्या मिळतात. बच्चू कडू यांच्या टीकेचे राणा समर्थक पर्वा करीत नाही. इतर कोणत्या नेत्यांमध्ये ही दानत आहे का? असा उलट प्रश्न राणा समर्थक उपस्थित करीत आहेत. यावेळी राणा दाम्पत्याने सुमारे ३ लाख साड्यांचे वाटप केल्याची माहिती आहे.