मराठी बातम्या  /  निवडणुका  /  satara lok sabha : शशिकांत शिंदे की सारंग पाटील?; शरद पवार यांच्या निर्णयाकडं सातारकरांच्या नजरा

satara lok sabha : शशिकांत शिंदे की सारंग पाटील?; शरद पवार यांच्या निर्णयाकडं सातारकरांच्या नजरा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 04, 2024 05:13 PM IST

Shashikant Shinde : सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

सातारा लोकसभेसाठी शरद पवारांच्या पक्षाकडून शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर
सातारा लोकसभेसाठी शरद पवारांच्या पक्षाकडून शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर

Satara Lok Sabha Constituency : राज्याच्या राजकारणात चर्चेच्या असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. त्याशिवाय, विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाविकास आघाडीतील जागावाटपात सातारा लोकसभा मतदारसंघ पवारांच्या राष्ट्रवादीकडं आला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव इथून लढण्यास नकार दिला आहे. मात्र, त्यांनी आपला मुलगा सारंग पाटील यांचं नाव पुढं केलं आहे. तर, शशिकांत शिंदे हेही इथून इच्छुक आहेत. 

या पार्श्वभूमीवर शिंदे आणि पाटील पितापुत्रांनी आज मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत पुन्हा एकदा सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. पवार साहेबांनी आदेश दिल्यास मी इथून लढण्यास तयार आहे, असं शशिकांत शिंदे यांनी बैठकीनंतर मीडियाशी बोलताना सांगितलं. त्यामुळं त्यांनी उमेदवारीसाठी जोर लावल्याचं चित्र आहे.

निष्ठांवत आणि आक्रमक नेता

शशिकांत शिंदे हे सातारा जिल्ह्यातील वजनदार नेते आहेत. स्वभावानं आक्रमक असलेल्या शिंदे यांना अनेक निवडणुकांचा अनुभव आहे. माथाडी कामगारांचे नेते म्हणूनही त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. शिंदे यांनी जावळी आणि कोरेगाव या दोन विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. या दोन्ही तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्यासोबत आहे. 

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेश शिंदे यांनी अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, त्यांचं महत्त्व लक्षात घेऊन पवारांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही त्यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. सातारा जिल्हा हा शरद पवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. इथून एखादा खमका उमेदवार द्यायचा झाल्यास शशिकांत शिंदे हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय असल्याचं बोललं जातं. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा विचारही शरद पवार यांच्याकडून सुरू होता. मात्र ते तुतारी चिन्हावर लढण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळं सध्या तरी शिंदे यांचं पारडं जड मानलं जात आहे.

श्रीनिवास पाटील मुलासाठी आग्रही पण…

श्रीनिवास पाटील हे मुलगा सारंग पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. ते शरद पवारांचे अत्यंत जवळचे मित्र आणि सहकारी आहेत. २०१९ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे यांच्या विरोधात लढण्याची हिंमत त्यांनी दाखवली होती. त्यामुळं त्यांचा आग्रह मान्य होतो की शरद पवार वेगळा निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे.

महायुतीतील तिढा कायम

महाविकास आघाडीत उमेदवारी उमेदवारी निश्चित होत नसताना तिकडं महायुतीमध्ये जागा कोणाकडं जाणार यावरच गाडं अडलं आहे. महायुतीतील भाजप, अजित पवार गट व शिंदे गटानंही या जागेवर दावा केला आहे. उदयनराजे भोसले इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र त्यांना अजित पवारांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची नाही. त्यामुळं पेच निर्माण झाला आहे. मात्र साताऱ्यातून उदयनराजे हेच महायुतीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

WhatsApp channel