इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ३८वा सामना आज (२२ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
यानंतर राजस्थानने प्रथम गोलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. राजस्थानचा अनुभवी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहललने या सामन्यात भीम पराक्रम केला आहे.
युझवेंद्र चहलने आपल्या आयपीएल कारकिर्दीत २०० बळी पूर्ण केले आहेत. मुंबई आणि राजस्थान सामना सुरू होण्यापूर्वी, चहलने १५२ सामन्यांमध्ये १९९ विकेट्स घेतल्या होत्या आणि या सामन्यात २०० बळी पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त एका विकेटची गरज होती. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद नबीला बाद करत चहलने कारकिर्दीतील २०० बळी पूर्ण केले. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा चहल हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ड्वेन ब्राव्हो आहे, ब्राव्होने आपल्या कारकिर्दीत १८३ विकेट्स घेतल्या आहेत.
युझवेंद्र चहलने २०१३ साली इंडियन प्रीमियर लीगमध्ये पहिला सामना खेळला होता. आता गेल्या १२ वर्षांत तो ३ संघांकडून खेळला आहे. चहलने २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून फक्त १ सामना खेळला, ज्यामध्ये तो एकही विकेट घेऊ शकला नव्हता.
त्यानंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी ८ हंगाम खेळले. युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी ११३ सामने खेळले आणि १३९ विकेट घेतल्या.
यानंतर लेगस्पिन जादूगार चहलने २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्समध्ये प्रवेश केला. चहलने आतापर्यंत राजस्थानसाठी ३९ सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या फिरकी चेंडूने ६१ बळी घेतले आहेत.
युझवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये पर्पल कॅपचा विजेताही ठरला आहे. २०२२ मध्ये तो पहिल्यांदा राजस्थान रॉयल्सकडून खेळला आणि त्याच मोसमात त्याने २७ विकेट घेत पर्पल कॅप जिंकली होती.
चहल हा असा गोलंदाज आहे ज्याने ५ वेगवेगळ्या हंगामात २० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. आपल्या कारकिर्दीतील २०० वी विकेट घेणारा चहल आयपीएल २०२४ मध्येही पर्पल कॅपच्या शर्यतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. चालू मोसमात त्याने आतापर्यंत १३ विकेट्स घेतल्या आहेत.