who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Apr 22, 2024 08:22 PM IST

Indian Chess Grandmaster D Gukesh : भारताच्या १७ वर्षीय डी. गुकेशने सोमवारी कॅनडातील टोरंटो येथे खेळल्या जाणाऱ्या कँडिडेट्स चेस टूर्नामेंट २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

Who Is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७ व्या वर्षी जिंकली  कँडिडेट्स चेस टूर्नामेंट
Who Is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७ व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट (PTI)

who is D Gukesh : भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी गुकेशने कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा (Candidates Chess Tournament) जिंकून नवा इतिहास रचला आहे. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारा तो भारताचा दुसरा खेळाडू तर ठरला आहेच, शिवाय ही स्पर्धा जिंकणारा डी गुकेश जगातील सर्वात तरुण खेळाडूही ठरला आहे.

आता जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत डी गुकेशचा सामना चीनचा खेळाडू डिंग लिरेनशी होणार आहे. गुकेशने कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत १४ पैकी ९ गुण मिळवले आणि अमेरिकन खेळाडू हिकारू नाकामुराविरुद्धचा अंतिम फेरीचा सामना अनिर्णित राखला.

सध्याच्या विश्वविजेत्याला आव्हान देणारा खेळाडू निवडण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे.

डी गुकेशने गॅरी कास्पारोव्हचा ४० वर्ष जुना विक्रमही मोडला

दरम्यान, कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकून चेन्नईच्या १७ वर्षीय डी गुकेशने अनुभवी गॅरी कास्पारोव्हचा ४० वर्ष जुना विक्रमही मोडला आहे. गॅरी कास्पारोव्हा हा वयाच्या २२ व्या वर्षी तत्कालीन विश्वविजेत्याला आव्हान देण्यासाठी पात्र ठरला होता.

डी गुकेश आणि अमेरिकन खेळाडू हिकारू नाकामुरा यांच्यातील सामना १०९ चालींपर्यंत चालला. यानंतर दोघांनी सामना बरोबरीत सोडवण्यास सहमती दिर्शविली.

या स्पर्धेतील डी गुकेशच्या कामगिरीवर नजर टाकली तर, त्याने ५ सामने जिंकले, तर एका सामन्यात त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. डी गुकेशला फ्रान्सच्या अलीरेझा फिरोझा याने पराभूत केले होते.

गुकेशला ७८.५ लाख रुपये मिळाले

गुकेशला बक्षीस म्हणून ८८५०० युरो (७८.५लाख रुपये) देखील मिळाले. या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ५ लाख युरो आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकणारा तो विश्वनाथन आनंद यांच्यानंतर दुसरा भारतीय ठरला. ५ वेळा विश्वविजेता आनंदने २०१४ मध्ये विजेतेपद पटकावले होते.

गुकेशला विजयासाठी फक्त ड्रॉची गरज होती आणि नाकामुराविरुद्ध त्याने सामना ड्रॉमध्ये संपवला.

बुद्धिबळातील नवीन चाणक्य डी गुकेश कोण आहे?

बुद्धिबळातील नवीन चाणक्य डी गुकेशचा जन्म २९ मे १००६ रोजी चेन्नई (तामिळनाडू) येथे तेलुगू कुटुंबात झाला. त्याचे पूर्ण नाव डोम्माराजू गुकेश आहे. त्याचे पालक आंध्र प्रदेशातील गोदावरी डेल्टा भागातील आहेत. त्याचे वडील डॉ. रजनीकांत हे कान-नाक आणि घसा सर्जन आहेत, तर आई पद्मा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहे. वयाच्या सातव्या वर्षी तो बुद्धिबळ खेळायला शिकला. तो चेन्नईतील वेल्लामल विद्यालयात शिकतो.

१२ व्या वर्षी ग्रँडमास्टर, आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

डी गुकेशने वयाच्या १२ व्या वर्षी ग्रँडमास्टर विजेतेपद पटकावले आणि बुद्धिबळाच्या इतिहासातील तिसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरला. हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने रौप्यपदक पटकावले होते. डोम्माराजू गुकेश २०२० चा वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ अकादमीचा (WACA) भाग आहे. तसेच, २०२३ पासून वेस्टब्रिज कॅपिटल्स डी गुकेशला स्पॉन्सर करतात.

Whats_app_banner
विभाग