IPL 2024 MI vs KKR : आयपीएल २०२४ शुक्रवारी (३ मे) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने मुंबईचा २४ धावांनी पराभव केला.
या सामन्यात केकेआरने मुंबईला विजयासाठी १७० धावांचे लक्ष्य दिले होते. याचा पाठलाग करताना त्यांचा संपूर्ण संघ १८.५ षटकांत १४५ धावांत गारद झाला. तसं पाहिलं तर वानखेडे स्टेडियमवर कोलकाताने १२ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवला.
दरम्यान, या सामन्यात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरला होता. या सामन्यात तो ११ धावा करून बाद झाला. नाणेफेकीच्या वेळी मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला रोहितबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्याने याबाबत स्पष्ट उत्तर दिले नव्हते. पण सामन्यानंतर पियुष चावलाने याबाबत माहिती दिली.
रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळल्याने चाहत्यांनी हार्दिक पांड्याला सोशल मीडियावर ट्रोल देखील केले. पण आता त्यामागचे कारण समोर आले आहे ज्यामुळे रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळावे लागले.
मुंबई इंडियन्सचा लेगस्पिनर पियुष चावलाने खुलासा केला आहे, की सलामीवीर रोहित शर्माला पाठ दुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात 'इम्पॅक्ट सब' म्हणून खेळावे लागले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर चावलाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 'त्याला पाठदुखीची समस्या जाणवत होती, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.'
इम्पॅक्ट सब म्हणून खेळायला आलेल्या रोहितला १२ चेंडूत केवळ ११ धावा करता आल्या. रोहित क्रीजवर सेट होण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्याने एक षटकारही मारला. मात्र सुनील नरेनविरुद्ध मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला केकेआरकडून २४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यामुळे पाच वेळचा चॅम्पियन संघ यंदाच्या आयपीएलमधून जवळपास बाहेर पडला आहे.
मुंबई इंडियन्सचा ११ सामन्यांमधला हा आठवा पराभव होता, त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघासाठी प्लेऑफचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. आता मुंबई केवळ सन्मानासाठी खेळणार असल्याचे चावलानेही मान्य केले. तो म्हणाला, 'आम्ही सन्मानासाठी खेळू कारण जेव्हा तुम्ही मैदानात उतरता तेव्हा तुम्ही पात्र व्हाल की नाही याचा विचार करत नाही. तुम्हाला तुमच्या नावासाठी खेळावे लागेल आणि त्यासाठीच आम्ही खेळणार आहोत".