इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL2024 ) च्या ५१ व्या सामन्यात आज (३ मे) कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) मुंबई इंडियन्सचा (MI) २४ धावांनी पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने मुंबईला विजयासाठी १७० धावांचे लक्ष्य दिले होते.
याचा पाठलाग करताना त्यांचा संपूर्ण संघ १८.५ षटकांत १४५ धावांत गारद झाला. तसं पाहिलं तर वानखेडे स्टेडियमवर कोलकाताने १२ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवला आहे. यापूर्वी २०१२ च्या मोसमात केकेआरने वानखेडे स्टेडियमवर मुंबईविरुद्ध पहिल्यांदाच विजय मिळवला होता. त्यावेळी केकेआरने यजमान संघाचा ३२ धावांनी पराभव केला होता.
मुंबई इंडियन्सकडून या सामन्यात सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले. तर टीम डेव्हिडने २० चेंडूत २४ धावा केल्या.
कोलकाता नाईट रायडर्सकडून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. यादरम्यान स्टार्कने १९व्या षटकात ३ खेळाडूंना बाद केले. तर वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
सध्याच्या आयपीएल हंगामात, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा ११ सामन्यांमध्ये हा ८वा पराभव होता आणि ते प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सने १० सामने खेळले असून ७ जिंकले आहेत. गुणतालिकेत कोलकाता संघ दुसऱ्या स्थानावर असून मुंबई ९व्या स्थानावर आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत १६९ धावांत आटोपला. व्यंकटेश अय्यरने ५२ चेंडूंत ७० धावा केल्या, ज्यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या मनीष पांडेने ४२ धावांची खेळी केली. पांडेने ३१ चेंडूंच्या खेळीत २ षटकार आणि २ चौकार मारले.
व्यंकटेश आणि मनीष यांच्यात पाचव्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे कोलकात्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडता आले. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषाराने प्रत्येकी ३ बळी घेतले. कर्णधार हार्दिक पंड्याने २ विकेट मिळवले.