csk vs pbks head to head record : आयपीएल २०२४ मध्ये रविवारी (५ मे) दोन सामने होणार आहेत. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हे संघ आमनेसामने असतील. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर दोन्ही संघ भिडतील. त्याचवेळी हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.
यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघ संध्याकाळी ७.३० वाजता आमनेसामने येतील. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना भारतरत्न श्री अटल बिहारी बाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
दरम्यान, आपण येथे चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्याबाबत जाणून घेणार आहोत.
रविवारी धरमशालामध्ये तापमान २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तसेच पावसाची शक्यता ६० टक्के आहे. मात्र, क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे फक्त रिमझिम पावसाची शक्यता आहे, मुसळधार पावसाची शक्यता नाही. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी आहे.
पंजाब किंग्जचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि प्रभसिमरन सिंग असू शकतात. याशिवाय फलंदाजीची जबाबदारी रिले रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा, आशुतोष शर्मा आणि सॅम करन यांच्यावर असेल. तसेच हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग हे गोलंदाजीची धुरा सांभाळू शकतात.
जॉनी बेअरस्टो, सॅम करन (कर्णधार), रिले रॉसौ, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
चेन्नई सुपर किंग्जचे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड असू शकतात. याशिवाय डेरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि एमएस धोनी हे फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतात. तसेच गोलंदाजीची जबाबदारी शार्दुल ठाकूर, मुकेश चौधरी, रिचर्ड ग्लीसन आणि मथिशा पाथिराना यांच्याकडे असेल.
अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, मुकेश चौधरी, रिचर्ड ग्लीसन आणि मथिशा पाथिराना.
आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आतापर्यंत २९ वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने १५, तर पंजाब किंग्जने १४ सामने जिंकले आहेत. अशाप्रकारे, आकडेवारीवरून सीएसकेचा संघ मजूबत दिसत आहे, परंतु दोन्ही संघांमधील अंतर फारसे नाही.
विशेष म्हणजे, या मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा भिडणार आहेत. या आधीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पंजाब किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.