MS Dhoni In World Cup 2023 : वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारता वनडे विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यासाठी बीसीसीआयकडून संघातील खेळाडूंसाठी चाचपणी सुरू आहे. मधल्या फळीतील फलंदाजी आणि गोलंदाजीवर बीसीसीआयने लक्ष केंद्रित केलं असून त्यासाठी अनेक खेळाडूंचा पर्याय तपासून पाहिला जात आहे. परंतु सध्या टीम इंडियाचा फॉर्म आणि पूर्ण संघ परफेक्ट नसल्याने चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. परिणामी आता महेंद्रसिंह धोनीला वर्ल्डकपसाठी पुन्हा खेळवण्याची मागणी करण्यात येत आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून विश्वचषकात खेळण्यासाठी बीसीसीआयने विनंती केल्यास धोनी निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता आहे.
केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या अनुपस्थितीत विश्वचषकात भारतीय संघात यष्टीरक्षण कोण करणार?, हा प्रश्न अद्यापही कायम आहे. इशान किशन आणि संजू सॅमसन यांच्या नावाची चर्चा असली तरी दोघांकडे फारसा अनुभव नाही. अशावेळी महेंद्रसिंह धोनीला संघात कर्णधारपदी संधी देत परत आणण्याची मागणी चाहत्यांकडून सोशल मीडियावर करण्यात येत आहे. महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असली तरी तो अद्याप आयपीएलमधून निवृत्त झालेला नाही. त्यामुळं आता चाहत्यांनी धोनीला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचा सल्ला दिला असून बीसीसीआयला धोनीला पुन्हा कर्णधारपदाची संधी देण्याची विनंती केली आहे. त्यामुळं आता भारतीय संघात मोठे फेरबदल होणार का?, यावरून चर्चांना उधाण आलं आहे.
महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाला आयसीसीच्या तिन्ही प्रकारच्या विश्वचषकात विजेतेपद मिळवून दिलेलं आहे. त्यामुळं धोनीने निवृ्त्तीचा निर्णय मागे घेतला तर त्याचा संघाला मोठा फायदा होणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुभवाचा तसेच नव्या दमाच्या खेळाडूंना योग्यवेळी संधी देत त्यांच्या क्षमतेचा वापर फक्त धोनीच करू शकतो, असाही तर्क चाहत्यांकडून लावला जात आहे. विश्वचषकात धोनीने खेळण्याचा निर्णय घेतला तर भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजीचा विषय निकाली लागेल आणि यष्टीरक्षणात चालाख, चतूर असलेल्या धोनीचा संघाला फायदा होणार असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळं आता यावर बीसीसीआय आणि एमएस धोनी काय निर्णय घेणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.