मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Wanindu Hasaranga : वानिंदू हसरंगाची अवघ्या २६ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, काय आहे कारण?

Wanindu Hasaranga : वानिंदू हसरंगाची अवघ्या २६ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, काय आहे कारण?

Aug 15, 2023 03:46 PM IST

Wanindu Hasaranga Test retirement : श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा यानं अवघ्या २६ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच कारण काय? वाचा!

Wanindu Hasaranga retires from test cricket
Wanindu Hasaranga retires from test cricket

Wanindu Hasaranga : श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा यानं अवघ्या २६ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानं तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. क्रिकेटचं अस्सल स्वरूप मानल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यामागचं कारणही त्यानं स्पष्ट केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हसरंगानं श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आपला कसोटी निवृत्तीचा निर्णय कळवला आहे. त्यासाठी हसरंगानं दिलेल्या कारणाची माहिती बोर्डानं दिली आहे. वानिंदू हसरंगाला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये (T 20 आणि ODI) जास्तीत जास्त काळ खेळायचं आहे. त्यासाठी कसोटी क्रिकेट पूर्ण थांबवण्याचा निर्णय त्यानं घेतला आहे.

हसरंगानं डिसेंबर २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून मागच्या तीन वर्षांत त्याला श्रीलंकेच्या संघाकडून केवळ चार कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. हसरंगानं दोन वर्षांपूर्वी एप्रिल २०२१ मध्ये घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. त्यामुळं आज, १५ ऑगस्ट रोजी त्यानं श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आपल्या निर्णयाची माहिती दिली.

हसरंगाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. येत्या काळात हसरंगा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी बजावेल, असा विश्वास बोर्डाचे सीईओ अ‍ॅशले डीसिल्वा यांनी व्यक्त केला आहे.

मर्यादित षटकांच्या सामन्यातील स्टार

वानिंदु हसरंगाला कसोटीमध्ये पुरेशी संधी मिळाली नसली तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो श्रीलंकेचा प्रमुख आधारस्तंभ आहे. २०१७ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून हसरंगा उत्तरोत्तर चांगली कामगिरी करत आहे. फलंदाजीबरोबरच उत्तम गोलंदाजी करणाऱ्या हसरंगानं श्रीलंका क्रिकेट संघासाठी ४८ एकदिवसीय आणि ५८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावावर एकूण १५८ विकेट आहेत आणि १३६५ धावा त्यानं केल्या आहेत. अलीकडंच झिम्बाब्वे इथं झालेल्या २०२३ च्या विश्वचषक पात्रता फेरीतही त्यानं दमदार कामगिरी केली होती. हसरंगा या स्पर्धेत सर्वाधिक २२ बळी घेणारा गोलंदाज होता. हसरंगा परदेशी टी-२० लीग मोठ्या प्रमाणात खेळतो.

टी-२० वर्ल्डकप २०२४