CSK vs KKR IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने ७ विकेट्सनी सहज विजय मिळवला.
दरम्यान, या सामन्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीर आणि सीएसकेचा विकेटकीपर फलंदाज एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना KKR संघाने २० षटकात ९ गडी गमावून केवळ १३७ धावा केल्या. म्हणजेच सीएसकेसमोर विजयासाठी केवळ १३८ धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात चेन्नईने १७.४ षटकांत केवळ ३ विकेट्स गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला.
चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाडने ५८ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ६७ धावा केल्या. डॅरिल मिशेल (२५) आणि शिवम दुबे (२८) यांनी उपयुक्त खेळी खेळली. तर सीएसकेला दोन धावांची गरज असताना फलंदाजीला आलेला 'थला' एमएस धोनी १ धाव करून नाबाद राहिला.
हा सामना संपल्यानंतर गौतम गंभीर आणि एमएस धोनी यांनी हस्तांदोलन केले आणि एकमेकांना मिठी मारली. या क्षणाचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
कारण २०११ च्या विश्वचषक विजेतेपदाचे श्रेय फक्त महेंद्रसिंह धोनीला दिले जाते. या श्रेयवादावरून गंभीर अनेकदा नाराज दिसला आहे. वर्ल्डकप विजयाचे श्रेय केवळ एका व्यक्तीला देता येणार नाही, असे गंभीर अनेक प्रसंगी म्हणाला आहे. गंभीरच्या या वक्तव्याने अनेकवेळा खळबळ उडाली आहे. तथापि, गंभीरने अनेकवेळा स्पष्ट केले आहे की तो एमएस धोनीचा खूप आदर करतो.
२०११ च्या विश्वचषक विजेतेपदाचे श्रेय संपूर्ण संघाला द्यायला हवे, असे गंभीर म्हणतो. अनेकवेळा त्याची वक्तव्ये वेगळ्या पद्धतीने घेतली जातात आणि त्यामुळे धोनी आणि गंभीर यांच्यात शत्रुत्व असल्याचे वातारवरण निर्माण होते.
तथापि, सीएसके आणि केकेआर यांच्यातील सामन्यानंतर त्यांच्या गळाभेटीमुळे दोघांमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचे स्पष्ट होते.
भारताला २०११ विश्वचषक जिंकून देण्यात महेंद्रसिंह धोनी आणि गौतम गंभीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. वानखेडे स्टेडियमवर २ एप्रिल २०११ रोजी श्रीलंकेविरुद्धच्या झालेल्या अंतिम सामन्यात गौतम गंभीरने ९७ धावांची इनिंग खेळली होती. तर एमएस धोनीने नाबाद ९१ धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. एमएस धोनीने मारलेला षटकार आजही चाहत्यांच्या मनात ताजा आहे.
संबंधित बातम्या