आयपीएल २०२४ मध्ये रविवारी (७ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी झाला. या हाय स्कोअरिंग सामन्यात मुंबईने दिल्लीचा २९ धावांनी पराभव केला.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ गडी गमावून २३४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटकांत ८ गडी गमावून २०५ धावा केल्या.
दिल्ली कॅपिटल्सचा हा या स्पर्धेतील चौथा पराभव आहे. तर मुंबईने यंदाचा पहिला विजय मिळवला.
सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची अवस्था खूपच खराब होती आणि ते ८० धावांहून अधिकच्या फरकाने सामना गमावतील असे वाटत होते. परंतु दक्षिण आफ्रिकेचा नवा फिनीशर ट्रिस्टन स्टब्सने शेवटी येऊन मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने अवघ्या २५ चेंडूत ७१ धावा चोपल्या. पण तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.
सुरुवातीच्या फलंदाजांनी संथ खेळी केली, त्याचा फटका दिल्लीला बसला. पण ४ नंबरवर आलेल्या ट्रिस्टन स्टब्सने आपली क्षमता दाखवून दिली. स्टब्सला दुसऱ्या टोकाने एक चांगला जोडीदार मिळाला असता तर हा सामना दिल्लीने जिंकला असता.
२३ वर्षीय ट्रिस्टन स्टब्सने केवळ २५ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ७१ धावा केल्या. त्याने २८४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. स्टब्सने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक ठोकले.
ट्रिस्टन स्टब्स दिल्लीसाठी मॅच फिनिशरची भूमिका साकारताना दिसत आहे. जेव्हा IPL २०२४ चा लिलाव झाला तेव्हा या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूला विकत घेण्यासाठी फक्त एकाच फ्रँचायझीने पॅडल उचलले आणि ते म्हणजे दिल्ली कॅपिटल्स. ट्रिस्टन स्टब्सला दिल्ली कॅपिटल्सने त्याची मूळ किंमत ५० लाख रुपये देऊन विकत घेतले.
दिल्लीपूर्वी स्टब्स मुंबई इंडियन्सच भाग होता, जिथे त्याला दोन हंगामात (२०२२ आणि २०२३) एकूण ४ सामने खेळण्याची संधी मिळाली.
स्टब्सने रविवारी दिल्ली कॅपिटल्ससाठी ज्या प्रकारे कामगिरी केली ते पाहता सध्याच्या आयपीएलमध्ये तो अशा अनेक स्फोटक खेळी खेळताना दिसू शकतो. मात्र, दिल्ली कॅपिटल्सला विजयी मार्गावर परतण्यासाठी काही योजना आखाव्या लागतील.
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ ५ सामन्यांत एक विजय आणि ४ पराभवांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर घसरला आहे. दिल्लीचा पुढील सामना शुक्रवारी लखनौविरुद्ध होणार आहे. 'पंत ब्रिगेड'ला विजयी मार्गावर परतण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.