इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा पुढचा सामना (१२ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. त्यानंतर १४ एप्रिलला लखनौचा संघ केकेआरला भिडेल. पण या सामन्यांआधी लखनौला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या संघासाठी अतिशय वाईट बातमी आहे.
वास्तविक, लखनौ सुपर जायंट्सचा युवा स्टार वेगवान गोलंदाज मयंक यादवला दुखापत झाली आहे. पुढील दोन सामन्यांमध्ये त्याचे खेळणे कठीण आहे. लखनऊ टीमचे सीईओ विनोद बिश्त यांनी त्याच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट दिले आहे.
एलएसजीचे सीईओ विनोद बिश्त यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मयंक यादवला खालच्या ओटीपोटात वेदना जाणवत आहेत आणि खबरदारी म्हणून आम्ही पुढील आठवडाभर त्याच्या कामाचा ताण मॅनेज करू. तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार आहे. तो लवकरच मैदानात पाहायला मिळेल अशी आशा आहे.
बिश्त यांच्या विधानाचा अर्थ असा आहे, की या आठवड्यात (१४ एप्रिल) ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात मयंक खेळू शकणार नाही. मयंक यादवची दुखापत बरी होण्यास जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे ते मैदानात परत कधी येणार हे पाहणे बाकी आहे.
गुजरात टायटन्सविरुद्ध डावातील चौथे षटक टाकण्यासाठी मयंक यादव मैदानात उतरला, परंतु हे षटक टाकल्यानंतर तो लगेच मैदानाबाहेर गेला. त्याने त्याच्या सुरुवातीच्या दोन सामन्यात १५० हून अधिकच्या वेगाने गोलंदाजी केली. पण गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याचा वेग १४० वर आला होता. त्या षटकात त्याने १३ धावा दिल्या. यानंतर त्याने मैदान सोडले.
विशेष म्हणजे, मयंक यादवला गेल्या वर्षीच्या मोसमात दुखातपतीमुळे एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मयंकला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत घोट्याच्या आणि हॅमस्ट्रिंगच्या दुखापतींचा सामना करावा लागला आहे.
त्याने पंजाब किंग्ज विरुद्ध या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून प्रभावित केले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या त्याच्या दुसऱ्या आयपीएल सामन्यात, या गोलंदाजाने १४ धावांत ३ बळी घेतले ज्यात त्याने या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू ताशी १५६.७ किमी वेगाने टाकला.
त्याने आतापर्यंत ३ सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा तो पहिला खेळाडू आहे.
संबंधित बातम्या