आयपीएल २०२४ च्या २१ व्या सामन्यात, लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि गुजरात टायटन्स (GT) आमने सामने होते. लखनौच्या एकना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनौने गुजरातचा ३३ धावांनी पराभव केला आणि चालू हंगामातील तिसरा विजय मिळवला.
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ संघाचा हा सलग तिसरा विजय ठरला. प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने ५ गडी गमावून १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ केवळ १३० धावाच करू शकला.
या सामन्यात यश ठाकूरने ५ विकेट्स घेत लखनौच्या विजयात सिंहाचा वाट उचलला. मात्र, चाहत्यांना वेगवान गोलंदाज मयंक यादवची गोलंदाजी पाहायची होती. तो आयपीएलमध्ये १५० च्या वेगाने गोलंदाजी करतो आहे.
पण गुजरातविरुद्धच्या सामन्यात केवळ एक षटक टाकल्यानंतर मयंक यादव मैदान सोडून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर त्याच्यासोबत असे काय घडले, ज्यामुळे त्याला मैदान सोडून तंबूत परतावे लागले, असे प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.
IPL २०२४ मध्ये तुफानी गोलंदाज म्हणून उदयास आलेला २१ वर्षीय मयंक यादव गुजरातविरुद्धच्या सामन्यात तितकासा प्रभावी दिसला नाही. लखनौसाठी मयंक चौथ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याने १४० किमी प्रतितास वेगाने दोन चेंडू टाकले, परंतु या सामन्यात त्याचा वेग जास्त नव्हता. या षटकात मयंकने १३ धावा दिल्या, मात्र त्यानंतर तो मैदानात परतलाच नाही. फिजिओ टीमने त्याला मैदानाबाहेर नेले.
यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याने मयंक यादवबद्दल खुलासा केला. त्याने सांगितले की, तो सध्या ठीक आहे. मी मयंकशी बोललो आणि तो ठीक आहे, त्यामुळे सर्व काही सकारात्मक दिसते. मी त्याच्याशी जे काही बोललो आणि जे काही पाहिले त्यावरून त्याचा खांदा ठीक असल्याचे दिसून आले".
मयंक यादवने आयपीएलच्या चालू हंगामात पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले होते. त्या सामन्यात मयंकने १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत सर्वांची मने जिंकली. मयंकने पहिल्या सामन्यातच ३ विकेट घेतल्या आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. आरसीबीविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही मयंकची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याला त्या सामन्यातही सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.