Uttar Pradesh Mobile Phone Blasts: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) स्कूटरवरून जात असताना खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट (Mobile Phone Blasts) झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. खिशातील मोबाईलचा स्फोट झाल्याने महिलेचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर तिची दुचाकी रस्त्यावरील दुभाजकावर धडकली. या महिलेने हेल्मेट न घातल्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेची दुचाकी दुभाजकाला धडकल्यानंतर घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमा झाली. त्यांनी त्वरीत स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारपूर्वीच रुग्णालय प्रशासनाने महिलेला मृत घोषित केले.
पूजा (वय, २८) असे मृत महिलेचे नाव असून ती फारुखाबाद जिल्ह्यातील नेहरारिया गावातील रहिवासी आहे. बुधवारी (२४ एप्रिल) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास महिला दुचाकीवरून कानपूरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. ही महिला कानपूर रेल्वे स्थानकावरून मुंबईला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी निघाली होती. मात्र, रस्त्यातच तिचा अपघाती मृत्यू झाला.
कानपूर-अलिगड महामार्गावर चौबेपूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मानपूर गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर ही दुःखद घटना घडली. महिलेने हेल्मेट घातले नव्हते आणि तिच्या कानात इअरफोन होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय, मृत महिला भरधाव वेगाने स्कूटर चालवत होती, त्यामुळे दुभाजकावर आदळल्यानंतर तिच्या डोक्याला मोठी दुखापत झाली, असेही सांगितले जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेत दुचाकीसह मोबाईलचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.