Navi Mumbai News: नवी मुंबईच्या उरण येथे गुरुवारी सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. चिरनेर गावातील ‘पोलीस पाटील’ संजय पाटील (६२) हे सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पोत्यातून दुर्गंधी आली. नेमके कशामुळे दुर्गंधी येत आहे, हे पाहण्यासाठी पोलीस पाटील पोत्याजवळ गेले, त्यांना पोत्यात एका अज्ञात महिलेचा मृतदेह दिसला. यानंतर त्यांनी त्वरीत जवळच्या पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.
कुजलेला मृतदेह तीन ते चार दिवसांपूर्वी तेथे टाकण्यात आल्याचा संशय आहे. महिलेच्या मृतदेहावर जखमेच्या कोणत्याही खुणा दिसत नाहीत, त्यामुळे तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर महिलेच्या मृत्युचे कारण स्पष्ट होईल. याप्रकरणी उरण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दादर चौपाटीवर शुक्रवारी दुपारी (१९ एप्रिल २०२४) एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. अज्ञात व्यक्तीची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह समुद्रात फेकण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या व्यक्तीच्या डोक्याला मार लागला असून त्याच्या कमरेवर आणि हातावर चाकूच्या जखमा असल्याचे समजत आहे. मृताच्या एका हातावर इंग्रजीत 'ज्योती' आणि दुसऱ्या हातावर हिंदीत 'रंजना' असा टॅटू आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
नागपूरच्या अंबाझरी येथील सुधार प्रन्यासच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून एका प्राध्यापकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. कुणाल किशोर साल्पेकर (वय, ३६) असे मृत्यू झालेल्य व्यक्तीचे नाव आहे. कुणाल यांना पोहता येत नसल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.