Two Missing Kids Found Dead In Mumbai: मुंबईतील अनॉटप हिल येथून धक्कादायक घटना उघडकीस आली. कालपासून बेपत्ता असलेल्या दोन मुलांची मृतदेह एका कारमध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. या मुलांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्युचे खरे कारण समजेल. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुस्कान मोहब्बत शेख (वय,५) आणि साजिद मोहम्मद शेख (वय, ७) असे मृतावस्थेत आढळलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. मुस्कान आणि साजिद बुधवारी दुपारी घराबाहेर खेळत होती. मात्र, बराच उशीर होऊनही ते घरी न परतल्याने पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र, दोघेही कुठेच न सापडल्याने त्यांनी अँटॉप हिल पोलिस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार देखील नोंदवली. मात्र, एका व्यक्तीला मुस्कान आणि साजिद एका कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. यानंतर पोलिसांनी कारचा दरवाजा तोडून मुलांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचा दरवाजा आतमधून लॉक झाल्याने मुलांचा गुदमरून मृत्यू , असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी आपघाती मृत्युची नोंद केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहेत. मात्र, या घटनेने शेख कुटुंबावर दुख:चे डोंगर कोसळले.
ठाणे जिल्ह्यातील काल्हेर गावात काही दिवसांपूर्वी घराशेजारील कारमध्ये अडकून तीन भावंडाचा गुदमरून मृत्यू झाला. दिलीप अमर माजी (वय, ७), रुबी अमर माजी (वय, ५) आणि राज विनोदसिंग सोनी (वय, ६) असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. नारपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराजवळ खेळत असताना ही मुले जवळच असलेल्या गोदामात उभ्या असलेल्या नवीन कारमध्ये घुसली आणि बाहेर येऊ शकली नाही. मुलांचा शोध घेण्याचा शोध निष्फळ ठरल्यानंतर मुलांच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही मुले स्टोअरहाऊसमध्ये शिरताना दिसल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने त्या ठिकाणाची कसून तपासणी सुरू केली असता पहाटे एका कारमध्ये हे तिघे आढळून आले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
संबंधित बातम्या