Pune Jangali Maharaj road firing : पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर आठवड्याभरपूर्वी एका बांधमक व्यावसायीकावर बंदूक रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. बांधकाम व्यावसायीकाच्या वडिलांनीच मुलाला मारण्याची तब्बल ७५ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून त्यांनी मुलाच्या खुनाची सुपारी गुंडांना दिल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी वडिलांसह सहाजणांना अटक केली आहे.
दिनेशचंद्र उर्फ बाळासाहेब शंकरराव अरगडे-पाटील (वय ६४, रा. भोसलेनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी वडिलांचे नाव आहे. त्यांच्यासह प्रशांत विलास घाडगे (वय ३८, रा. वारजे), अशोक लक्ष्मण ठोंबरे (वय ४८, रा. एरंडवणे), प्रवीण उर्फ पऱ्या तुकाराम कुडले (वय ३१, रा. सुतारदरा, कोथरुड), योगेश दामोदर जाधव (वय ३९), चेतन अरुण पोकळे (वय २७) यांना देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी धीरज दिनेशचंद्र अरगडे-पाटील (वय ३८,रा. खडकी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
१६ एप्रिलला पाटील हे दुपारी जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्स इमारतीजवळ असतांना दुचाकीवरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने आरोपींच्या बंदुकीतून गोळी न सुटल्याने धिरज पाटील हे थोडक्यात बचावले. या घटनेने खळबळ उडाली होती. पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास करण्यासाठी तपास सुरू केला होता. आरोपींना पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. धीरज अरगडे यांच्या निकटवर्तीय व कुटुंबीयांची देखील चौकशी करण्यात आली. धीरज यांचा घटस्फोट झाला होता. ते एका तरुणीबरोबर विवाह न करता राहत होते. वडिलांना ही गोष्ट खटकली होती. वडील आणि मुळात कौटुंबिक आणि मालमत्तेच्या कारणावरून वाद झाले होते. याच वादातून दिनेशचंद्र यांनी मुलगा धिरज यांची हत्या करण्याचा कट रचला. यासाठी गुंडांना ७५ लाख रुपयांची सुपारी देखील दिली. पोलिसांनी याचा छडा लावून धिरज यांचे वडील दिनेशचंद्र यांच्यासह ६ जणांना अटक केली.
बांधकाम व्यावसायिक धीरज अरगडे यांच्यावर १० मार्च रोजी आरोपींनी चाकूने वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यातून ते बचावले होते. दरम्यान, आरोपी कुडले व पोकळे यांनी धीरज यांचा मृत्यू झाल्याचे खोटे सांगून दिनेशचंद्र यांच्याकडून २० लाख रुपये उकळले होते. या हल्ल्यातून धीरज बचावल्याचे समजल्यानंतर धीरजच्या वडिलांचा आरोपी कुडले आणि पोकळे यांच्याशी वाद झाला होता.
धीरज अरगडे यांच्याकडे कार आहे. आरोपींनी अरगडे यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांच्या नकळत त्यांच्या कारमध्ये जीपीएस यंत्रणा बसविली होती. १६ एप्रिल रोजी अरगडे मोटारीतून जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयात आले होते. याबाबत आरोपींनी त्यांच्यावर पाळत ठेवली. दरम्यान ते कार्यालयातून बाहेर पडल्यावर पिस्तूल रोखून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गोळी न चालल्याने धिरज हे यातून वाचले होते.
संबंधित बातम्या