two workers die in Malad : मुंबईच्या मालाड येथे एक धक्कादायक घटना उघकडीस आली आहे. येथील पिंपरीपाडा परिसरातील रहेजा टॉवरचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या शौचालयाची टाकी स्वच्छ करण्यासाठी ४ कामगार उतरले होते. मात्र, ते बाहेर न आल्याने अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने बाहेर काढले. मात्र, यातील दोघांचा मृत्यू झाला होता. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.
राजू (वय ५०, पूर्ण नाव समजू शकले नाही), जावेद शेख (वय ३५) अशी मृत्यू झालेल्या दोन कामगारांची नावे आहेत. तर अकीब शेख (वय १९) याची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालाड परिसरातील राणी सती मार्गावरील रत्नागिरी हॉटेल जवळच रहेजा टॉवरच्या इमारतीचे काम सुरू आहे. दरम्यान या इमारतीचे काम सुरू असतांना बुधवारी शौचालयाची टाकी स्वच्छ करण्यासाठी ४ कामगार उतरले होते. ही टाकी तब्बल ४० फूट खोल आहे. मात्र बराच वेळ होऊन देखील हे कामगार बाहेर आले नाही.
त्यामुळे इतर कामगारांना संशय आला. त्यांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे कर्मचारी काही वेळात घटनास्थळी आले. यानंतर टाकीत असलेल्या कामगारांचा अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेतला. शौचालयाच्या टाकीत तीन ते चार कामगार उतरल्याची माहिती घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्या आधारे कामगारांचा शोध घेऊन तिघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना जोगेश्वरीतील पालिकेच्या ट्रामा केअर रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, यातील दोन कामगारांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर एका कामगारांची प्रकृती ही चिंताजनक आहे.
रहेजा टॉवर ही खासगी इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामादरम्यान सेफ्टीक टँक स्वच्छ करण्यासाठी खासगी कंत्राटदाराने हे कामगार नेमले होते. कामगारांना शौचालयाच्या टाकीत उतरण्यास कायद्याने बंदी असताना त्याने कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी न घेत त्यांना टाकीत उतरवल्यामुळे ही घटना घडली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.