मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  UP : उत्तर पत्रिकेत 'जय श्रीराम' आणि क्रिकेटपटूंची नावं लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना पास केलं; प्राध्यापकांची हकालपट्टी

UP : उत्तर पत्रिकेत 'जय श्रीराम' आणि क्रिकेटपटूंची नावं लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना पास केलं; प्राध्यापकांची हकालपट्टी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 26, 2024 06:52 PM IST

Veer Bahadur Singh Purvanchal University : डीफार्म परीक्षेच्या उत्तर पत्रिकेत योग्य उत्तरांऐवजी जय श्रीराम आणि क्रिकेटपटूंची नावं लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना पास केलं गेल्याची घटना उत्तर प्रदेशातील एका विद्यापीठात घडली आहे.

The professors allegedly took bribe from students to pass them with good marks.
The professors allegedly took bribe from students to pass them with good marks. (Getty Images/iStockphoto/ Representational image)

Veer Bahadur Singh Purvanchal University : उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील वीरबहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठात धक्कादायक प्रकार घडला आहे. परीक्षेत गुण देताना दोन प्राध्यापकांनी मोठा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. उत्तर पत्रिकेत योग्य उत्तराऐवजी 'जय श्रीराम', क्रिकेटपटूंची नावे आणि इतर अप्रासंगिक मजकूर लिहिणाऱ्या डीफार्मच्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनी चक्क पास केल्याचं उघडकीस आलं आहे.

'आजतक'नं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. त्यानुसार, उद्देश्य आणि दिव्यांशू सिंह या दोन विद्यार्थी नेत्यांनी आरटीआय अंतर्गत माहिती मागवली होती. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांकडून लाच घेऊन त्यांना उत्तीर्ण केल्याचा विद्यार्थी नेत्यांचा आरोप होता. त्यामुळं डी फार्म अभ्यासक्रमाच्या सुमारे १८ विद्यार्थ्यांचे रोल नंबर मागवून त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या प्रती घेऊन त्यांचं पुनर्मूल्यांकन करण्याची विनंती त्यांनी केली. या संदर्भात त्यांनी राजभवनला तक्रारही केली.

राजभवननं २१ डिसेंबर २०२३ रोजी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनानं समिती स्थापन केली. बाहेरच्या प्राध्यापकांकडून काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचं फेरमूल्यांकन करण्यात आलं. त्या तपासणीत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गुणांमध्ये कमालीची तफावत दिसून आली. ज्या विषयात आरोपी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना ५२ आणि ३४ गुण दिले होते, त्याच विषयांत बाहेरच्या प्राध्यापकांनी केवळ शून्य आणि चार गुण दिले. या घटनेनंतर कुलगुरू वंदना सिंह यांनी विनय वर्मा आणि आशिष गुप्ता या दोन प्राध्यापकांची हकालपट्टी केली आहे.

याआधीही घडला होता असा प्रकार

यापूर्वी भारतीय पोलीस सेवेचे (IPS) अधिकारी अरुण बोथरा यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वरून परीक्षेतील गैरव्यवहाराचा आरोप केला होता. ‘एका विद्यार्थ्यानं उत्तरपत्रिकेत पैसे ठेवले आणि परीक्षकांना पासिंग मार्क्स देण्याची विनंती केली होती. बोथरा यांनी उत्तरपत्रिकेत ठेवलेल्या नोटांचं छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केलं होतं. ’आमचे विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेबद्दल हे चित्र बरंच काही सांगून जातं,' अशी खंत बोथरा यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केली होती. त्यांच्या या पोस्टवर असंख्य प्रतिक्रिया आल्या होत्या. असे प्रकार आमच्या सोबत आणि आमच्या परिचयातील लोकांसोबतही घडल्याचं लोकांनी म्हटलं होतं.

IPL_Entry_Point

विभाग