श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ खळबळ उडवून दिली आहे. केकेआरने प्लेऑफमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. केकेआरने आज रविवारी (५ मे) आयपीएल २०२४ च्या ५४ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा ९८ धावांनी पराभव केला आणि प्लेऑफमध्ये एन्ट्री केली.
कोलकाता संघाने आतापर्यंत ११ पैकी ८ सामने जिंकले आहेत. यासह त्यांनी आता राजस्थान रॉयल्सला मागे टाकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, लखनौ संघाने आतापर्यंत ११ पैकी ६ सामने जिंकले आहेत. यासह हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरला आहे.
तत्पूर्वी, या सामन्यात कोलकाताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २३६ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात लखनौचा संघ १६.१ षटकांत १३७ धावांवरच गारद झाला.
लखनौ संघाकडून मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक ३६ धावा केल्या आणि कर्णधार केएल राहुलने २५ धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. कोलकाताकडून हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी ३ बळी घेतले. तर आंद्रे रसेलला २ विकेट मिळाले.
या सामन्यात केकेआरने दमदार सुरुवात केली होती. सुनील नरेन आणि फिल सॉल्ट यांच्यात पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी झाली जी नवीन-उल-हकने मोडली. त्याने सॉल्टला बाद केले. तो ३२ धावा करून बाद झाला.
तर नरेनने ८१ धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ६चौकार आणि ७ षटकार आले. रवी बिश्नोईने त्याला आपला बळी बनवले. संघाला तिसरा धक्का आंद्रे रसेलच्या रूपाने बसला. नवीन-उल-हकने त्याला शिकार बनवले. त्याला केवळ १२ धावा करता आल्या.
यानंतर युधवीर सिंहने अंगक्रीष रघुवंशी याची शिकार केली. तो २६ चेंडूत ३२ धावांची खेळी खेळून परतला. या सामन्यात रिंकू सिंगने १६ धावा, श्रेयस अय्यरने २३ धावा, रमणदीप सिंगने २५ धावा केल्या.
रमणदीप आणि व्यंकटेश नाबाद राहिले. लखनौकडून नवीन-उल-हकने ३ बळी घेतले. तर यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि युधवीर सिंग यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.