आयपीएल २०२४ मध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात कोलकाताने ९८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सुनील नरेनने केवळ ३९ चेंडूत ८१ धावांची तुफानी खेळी केली, ज्यामध्ये त्याने ६ चौकार आणि ७ षटकार मारले.
पण अशातच आता या सामन्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सुनील नरेन दारूच्या नशेत फलंदाजी करत होता, असा दावा केला जात आहे. तसेच, दारू पिऊन फलंदाजी केल्याने सुनील नरेनला आयपीएल २०२४ मधून बाहेर काढल्याचा दावाही सोशल मीडियवर केला जात आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, सुनील नरेन दारू पिऊन फलंदाजी करत असल्याची माहिती केएल राहुलने दिली. यानंतर बीसीसीआयनेही या प्रकराचा तपास केला आणि तपासात सुनील नरेन दोषी आढळला."
पण, या माहिती सत्यता तपासली असता, अशी कोणतीही घटना घडलेली नाही. केएल राहुलने अशी कोणतीही माहिती बीसीसआयला दिली नाही. या सर्व अफवा आहेत.
क्रिकेटविश्वात दारू पिऊन फलंदाजी केल्याच्या घटना घडल्या असल्या तरी सुनील नरेनबाबत पसरलेल्या बातम्या खोट्या आहेत.
सुनील नरेन पेशाने गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे. पण नरेनने IPL २०२४ मध्ये पुन्हा KKR साठी ओपनिंग सुरू केली आहे. सलामीच्या फलंदाजाची भूमिका बजावत त्याने या मोसमात शानदार फलंदाजी केली आहे. नरेनने आतापर्यंत ११ सामन्यांत ४१.९१ च्या सरासरीने ४६१ धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता फक्त विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडच त्याच्या पुढे आहेत. नरेनने या मोसमात १८३.६७ च्या तुफानी स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे.
IPL २०२४ मध्ये सुनील नरेन KKR साठी एकूण फुल पॅकेज ठरत आहे. तो केवळ बॅटने धावा काढत नाही, तर त्याच्या फिरकीची जादूही खूप प्रभावी ठरली आहे. नरेनने आतापर्यंत ११ सामन्यांत १४ बळी घेतले असून त्याचा इकॉनॉमी रेट ७ पेक्षा कमी आहे. नरेन सध्या पर्पल कॅपच्या शर्यतीत सहाव्या स्थानावर आहे.