Ice-cream vendor stabbed to death at India Gate : राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेट जवळ एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंडिया गेट जवळ आईस्क्रीम विक्रेत्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच दिल्ली पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
प्रभाकर (वय २५) असे हत्या करण्यात आलेल्या मृत आईस्क्रीम विक्रेत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेची माहीती मिळताच पोलिसांचे पथक बुधवारी रात्री घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी त्यांना एक आईस्क्रीम विक्रेता पडून असल्याचे दिसले. त्याला दवाखान्यात नेण्यात आले मात्र, त्याचा मृत्यू झाला होता.
ही घटना किरकोळ वादातून झाली. आइसक्रीम विक्रेता आणि आरोपीमध्ये हाणामारी झाली. यात आईसक्रीम विक्रेत्यावर चाकूने हल्ला करण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मृताच्या शरीरावर तीन जखमा आहेत, त्यापैकी एक खूप खोल आहे. चाकूचा घाव वर्मी बसल्याने त्याचा मृत्यू झाला. आम्ही मृत व्यक्तीच्या बॅगेतून काही पैसे आणि एक घड्याळ देखील ताब्यात घेतले आहे,” असे पोलिसांनी एएनआयला सांगितले. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी येथील आजूबाजूच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीची ओळख पटली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी फेब्रुवारीमध्ये देखील उत्तर दिल्लीच्या चांदनी चौक परिसरात एका २५ वर्षीय आईस्क्रीम विक्रेत्याची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीने हत्या झालेल्या तरूणांवर चाकूने अनेक वार केले होते. जखमी व्यक्तीच्या त्याच्या पाठीवर, नितंबावर व मांडीवर अनेक जखमा होत्या. त्याला एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याचा मृत्यू झाला.
या घटनेचा तपास करण्यासाठी तपास पथके तयार करण्यात आली आहेत. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासात असे आढळले की, दोन-तीन दिवसांपूर्वी मृत आईस्क्रीम विक्रेत्याचे दुसऱ्या आइसक्रीम विक्रेत्याशी भांडण झाले होते. दोघांच्या भांडणातून ही हत्या करण्यात आली का याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.