लोकसभेची लडाई आता न्यायालयात पोहोचली आहे. दिल्ली हायकोर्टात (delhi high court) एका वकीलाने याचिका दाखल करत (Plea against pm Narendra modi) मागणी केली आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ६ वर्षापर्यंत निवडणूक लढण्यास बंदी घालावी. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले की, लोकसभा निवडणुकीच्या (lok sabha polls) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कथितरित्या देव व धार्मिक स्थळांच्या नावावर मते मागून आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांना निवडणूक लढण्यापासून रोखले पाहिजे.
दिल्ली उच्च न्यायालयात दाखल या याचिकेत म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यांनी देवाच्या नावावर मते मागितली आहेत.
आनंद एस. जोंधळे नावाच्या वकिलांनी ही याचिका दाखल केली आहे. जोंधळे यांनी आपल्या याचिकेत पंतप्रधान मोदींच्या उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे ९ एप्रिल रोजी केलेल्या भाषणाचा हवाला देत म्हटले आहे की, त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी मतदारांना हिंदू देवता आणि हिंदू धार्मिक स्थळे, तसेच शीख देवतांचे वर्णन करत मतदान करण्याचे आवाहन केले. याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत पीएम मोदी यांच्यावर सहा वर्षापर्यंत निवडणूक लढण्यास बंदी लादण्याची मागणी केली आहे.
बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार, याचिकेत म्हटले आहे की, प्रतिवादी नंबर २ (पीएम मोदी) यांनी आपल्या भाषणात कथितरित्या म्हटले की, त्यांनी राम मंदिराचे निर्माण केले आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटले की, त्यांनी कर्तारपूर साहिब कॉरिडॉर विकसित केला आहे, तसेच गुरुद्वारांमध्ये होणाऱ्या लंगरमधील सामुग्री जीएसटीमुक्त केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, प्रतिवादी नंबर २ यांनी म्हटले की, अफगानिस्तानमधून गुरु ग्रंथ साहिबच्या प्रति परत आणल्या आहेत.
याचिकाकर्त्यांने आपल्या अर्जात म्हटले की, पंतप्रधान मोदींनी केवळ हिंदू आणि शीख देवी-देवता तसेच धार्मिक स्थळांच्या नावावरून मते मागितली नाहीत. तर विरोधी पक्षांच्या विरोधात बोलताना त्यांनी टिप्पणी केली की, ते मुस्लिमांचा पक्ष घेतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या आधी वृत्तसंस्था ANI ला दिलेल्या मुलाखतीत इलेक्टोरल बॉन्डबाबत म्हटले की, देशाला पुन्हा एकदा काळ्या धनाकडे ढकललं आहे. त्यांनी म्हटले की, निवडणुका काळ्या पैशापासून मुक्त करण्यासाठी इलेक्टोरल बॉन्ड योजना सुरू करण्यात आली होती. मात्र ही योजना रद्द केल्यामुळे निवडणुकात काळ्या पैशाचा वापर वाढताना दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, हे देशासाठी खूपच धोकादायक आहे. त्यांनी इशारा देताना म्हटले की, याचा विरोध करणारे लोक या मुद्द्यावर भविष्यात पश्चाताप करतील.
संबंधित बातम्या