मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  atishi allegations on BJP : आमच्या पक्षात या, नाहीतर अटक करू; भाजपकडून धमकी आल्याचा दिल्लीच्या मंत्री आतिशी यांचा आरोप

atishi allegations on BJP : आमच्या पक्षात या, नाहीतर अटक करू; भाजपकडून धमकी आल्याचा दिल्लीच्या मंत्री आतिशी यांचा आरोप

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 02, 2024 11:47 AM IST

Delhi Liquor scam case : दिल्लीत कथित मद्य घोटाळ्यात नाव आल्यानंतर भाजपकडून धमकीवजा ऑफर आल्याचा दावा दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी केला आहे.

भाजपमध्ये या, नाहीतर एका महिन्यात अटक करू; दिल्लीच्या मंत्री आतिशी यांना धमकी?
भाजपमध्ये या, नाहीतर एका महिन्यात अटक करू; दिल्लीच्या मंत्री आतिशी यांना धमकी?

Atishi Allegations on BJP : कथित दारू घोटाळ्यात नाव येताच दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी भारतीय जनता पक्षावर खळबळजनक आरोप केले आहेत. भाजपनं मला पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश न केल्यास एका महिन्यात अटक करू, अशी धमकी देण्यात आल्याचा दावा आतिशी यांनी केला आहे. सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चढ्ढा यांनाही अटक केली जाऊ शकते असा दावाही आतिशी यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी (Delhi Liquor Scam) सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, माजी मंत्री सत्येंदर सिंह आणि खासदार संजय सिंह तुरुंगात आहेत. याच प्रकरणात आता आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांची नावं आली आहेत. त्यानंतर त्यांच्या अटकेची चर्चा सुरू आहे.

हे सगळं सुरू असतानाच आतिषी यांनी भाजपकडून धमकी आल्याचा आरोप केला आहे. 'भाजपनं एका जवळच्या व्यक्तीच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क केला आणि भाजप प्रवेशाची ऑफर दिली. राजकीय करिअर वाचवायचं असेल तर भाजपमध्ये या, नाहीतर ईडी येत्या महिन्यात तुम्हाला अटक करेल, असं संबंधित व्यक्तीनं मला सांगितल्याचं आतिशी म्हणाल्या.

न्यायालयात नेमकं काय घडलं?

कोठडीची मुदत संपल्यामुळं ईडीनं सोमवारी केजरीवाल यांना न्यायालयात हजर केलं होतं. विजय नायर हा आरोपी केजरीवाल यांच्या संपर्कात होता असा दावा यावेळी ईडीनं केला. त्यावर नायर हा मला रिपोर्ट करत नव्हता. आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना रिपोर्ट करायचा, असं केजरीवाल यांनी सांगितलं. केजरीवाल यांच्या या विधानानंतर आतिशी आणि भारद्वाज यांची नावं या प्रकरणात समोर आली आहेत.

न्यायालयात हे सगळं घडत असताना आतिशीही तिथं उपस्थित होत्या. त्यांनी मीडियाशीही याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला. त्यामुळं भाजपच्या नेत्यांनी लगेचच आरोपांच्या फैरी सुरू केल्या. त्यानंतर आज आतिशी यांनी भाजपनं दिलेल्या ऑफरचा आणि धमकीचा गौप्यस्फोट केला.

IPL_Entry_Point