Arvind Kejriwal routine in Tihar Jail : दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगात आहेत. न्यायालयानं त्यांची न्यायालयीनं कोठडी १५ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. त्यानंतर त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे.
दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणाशी (Delhi Liquor Case) संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर २८ मार्च रोजी त्यांची कोठडी वाढवण्यात आली होती. आज पुन्हा त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
इतर कैद्यांप्रमाणेच अरविंद केजरीवाल यांच्या दिवसाची सुरुवात सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास होईल. नाश्त्यात त्यांना चहा आणि ब्रेडचे काही तुकडे मिळतील. सकाळी १०.३० ते ११ या वेळेत दुपारचं जेवण दिलं जाईल. त्यात डाळ (डाळ), एक भाजी (भाजी) आणि पाच रोटी किंवा तांदूळ असतील, असं एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
जेवणानंतर कैद्यांना दुपारी ३ वाजेपर्यंत कोठड्यांमध्ये बंद केले जाते. दुपारी साडेतीन वाजता त्यांना एक कप चहा आणि दोन बिस्किटे मिळतात आणि दुपारी चार वाजता वकिलांना भेटता येते. संध्याकाळचं जेवण तुलनेनं लवकर म्हणजे साडेपाच वाजता दिलं जातं आणि त्यानंतर सायंकाळी सात वाजल्यापासून रात्रभर त्यांच्या कोठडीत बंद ठेवलं जातं.
न्यायालयीन सुनावणी पूर्वनियोजित असेल तर केजरीवाल न्यायालयात जाऊ शकतात किंवा दुपारच्या जेवणापूर्वी त्यांच्या कायदेशीर टीमसोबत बैठक घेऊ शकतात.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, केजरीवाल यांच्यासाठी टीव्हीची सोय करून देण्यात आली आहे. बातम्या, मनोरंजन, खेळ असे एकूण १८ ते २० चॅनल्स त्यांना पाहता येणार आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी त्यांच्यासाठी २४ तास उपलब्ध राहतील.
इतर कैद्यांप्रमाणेच केजरीवाल देखील आठवड्यातून दोनदा कुटुंबातील सदस्यांना भेटू शकतात.
केजरीवाल यांना अटक झाल्यापासून त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती आम आदमी पक्षाच्या एका नेत्यानं मागील आठवड्यात हिंदुस्तान टाइम्सला दिली होती.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या साखरेची पातळी सतत चढ-उतार होत आहे आणि ती ४६ पर्यंत खाली आली आहे. साखरेची पातळी एवढी खाली जाणं धोकादायक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
रामायण, श्रीमद्भगवद्गीता आणि पत्रकार नीरजा चौधरी लिखित ‘पंतप्रधान कसे निर्णय घेतात’, या पुस्तकाच्या प्रती देण्यात याव्यात, अशी विनंती केजरीवाल यांनी केली होती. मात्र, ही पुस्तकं त्यांना द्यायची की नाही याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.