Arvind Kejriwal news : दिल्लीतील कथित मद्य उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. न्यायालयात येण्याआधी मीडियाशी बोलताना केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला.
केजरीवाल यांच्या कोठडीची मुदत आज, १ एप्रिल रोजी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज त्यांना दिल्ली राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी मीडियानं त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी केजरीवाल एक वाक्य बोलले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी जे करत आहेत, ते देशासाठी चांगलं नाही, असं केजरीवाल म्हणाले.
अंमलबजावणी संचालनालयानं (ED) केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती. एएसजी एस. व्ही. राजू यांनी ईडीची बाजू मांडली. केजरीवाल हे तपासात सहकार्य करत नाहीत आणि सतत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, असं सांगत ईडीनं केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. केजरीवाल यांना तूर्त न्यायालयीन कोठडी सुनावण्यास हरकत नाही, मात्र नंतर ईडीला त्यांच्या आणखी कोठडीची आवश्यकता लागू शकते, असं राजू यांनी खंडपीठापुढं सांगतिलं.
केजरीवाल यांना कोर्टात आणलं गेलं तेव्हा त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि 'आप'च्या नेत्या आतिशीही कोर्टात हजर होत्या. न्यायालयाच्या निर्णयानंतर केजरीवाल आता पुढील १५ दिवस तिहार तुरुंगात राहणार आहेत.
दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीनं केजरीवाल यांना अटक केली आहे. या संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार केजरीवाल असल्याचा ईडीचा दावा आहे. अटकेनंतर सुरुवातीला केजरीवाल यांना ७ दिवसांच्या ईडी रिमांडवर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर २८ मार्च रोजी केजरीवाल यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं आणि ईडीची कोठडी १ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. आज ही मुदत संपल्यानंतर न्यायालयानं केजरीवाल यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली.