Sanjay Singh Gets bail : दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोठडीत असताना झालेली संजय सिंह यांची सुटका हा 'आप'साठी मोठा दिलासा मानला जात आहे.
दिल्ली सरकारचं उत्पादन शुल्क धोरण (Delhi Liquor Case) ठरवण्यात व त्याची अंमलबजावणी करण्यात संजय सिंह यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते स्वत: या घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचा दावा ईडीनं केला होता. गेल्या वर्षी ४ ऑक्टोबर रोजी अंमलबजावणी संचालनालयानं सिंह यांच्या घरावर दिवसभर छापे टाकून त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. गेल्या सहा महिन्यांपासून ते तुरुंगात होते. मात्र, संजय सिंह यांच्याकडं भ्रष्टाचाराची कोणतीही रक्कम ईडीला मिळाली नव्हती.
संजय सिंह यांच्याकडून कुठलीही रक्कम जप्त करण्यात आली नाही. ते सहा महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांची काही चौकशी करायची असल्यास सुनावणी सुरू असतानाही होऊ शकते. त्यामुळं आता त्यांच्या कोठडीची गरज आहे का, असा प्रश्न न्यायालयानं केला होता. त्यावर सिंह यांना जामीन देण्यास हरकत नसल्याचं सक्तवसुली संचालनालयानं सांगितलं.
ईडीच्या युक्तिवादानंतर व एकूण परिस्थितीचा अभ्यास करून न्यायमूर्ती संजीव खन्ना, दीपांकर दत्ता आणि पी. बी. वराळे यांच्या खंडपीठानं संजय सिंह यांना जामीन मंजूर केला. संजय सिंह यांच्या जामिनासाठी अटी व शर्ती कनिष्ठ न्यायालय निश्चित करेल, असं खंडपीठानं स्पष्ट केलं.
दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे.' सत्यमेव जयते', असं त्यांनी सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे.
दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याशिवाय माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया व माजी मंत्री सत्येंद्र जैन हे देखील तुरुंगात आहेत. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवण्यात आला आहे. अर्थात, हे सगळे आरोप राजकीय सूडबुद्धीनं ठेवण्यात आलेले असून केंद्रातील मोदी सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करून आमच्या नेत्यांचा छळ करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे. ज्या व्यक्तीच्या साक्षीच्या आधारे केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. तो भाजपचा देणगीदार असल्याचा दावाही आम आदमी पक्षानं केला आहे.
संबंधित बातम्या