Patanjali misleading ad case : दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल योगगुरू बाबा रामदेव यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बाबा रामदेव (baba Ramdev) यांना अवमान प्रकरणी उत्तर देण्याची आणखी एक संधी दिली. या प्रकरणी पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.
बाबा रामदेव आणि त्यांच्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार दोघेही आज सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. रामदेव यांच्या वतीनं वकिलांनी युक्तिवाद केला. ‘अशा जाहिरातीबद्दल आम्ही माफी मागतो. न्यायालयापासून पळून जाण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. बाबा रामदेव स्वत: न्यायालयात आहेत. ते माफी मागत आहे. तुम्ही त्याची माफी रेकॉर्डवर घेऊ शकता,’ अशी विनंती वकिलांनी न्यायालयाला केली.
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत पतंजलीची बाजू मांडताना रामदेव बाबांचे वकील म्हणाले की, ‘आमच्या मीडिया विभागाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती नव्हती. म्हणूनच अशी जाहिरात निघाली. मात्र, न्यायमूर्ती अमानुल्ला आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. 'तुम्हाला न्यायालयाच्या आदेशाची माहिती नव्हती यावर विश्वास बसणं कठीण आहे, असं न्यायमूर्ती म्हणाले. तर, न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी केंद्र सरकारलाही फटकारलं. केंद्र सरकारनं याकडं डोळेझाक कशी केली याचं आश्चर्य वाटतं, असं कोहली म्हणाल्या.
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती मागे घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं नोव्हेंबर २०२३ मध्येच पतंजलीला दिले होते. तसं न केल्यास कारवाई करू. पतंजलीच्या प्रत्येक चुकीच्या जाहिरातीवर १ कोटी रुपयांचा दंड आकारला जाईल, असंही न्यायालयानं बजावलं होतं.
यावेळी न्यायमूर्ती अमानुल्ला यांनी बाबा रामदेव यांचं कौतुक केलं. योगाच्या बाबतीत रामदेव बाबांनी खूप चांगलं काम केलंय. मात्र, ॲलोपॅथीच्या औषधांबाबत असे दावे करणं योग्य नाही, असं अमानुल्ला यांनी नमूद केलं.
पतंजलीनं त्यांची जाहिरात करावी, पण त्यात ॲलोपॅथी वैद्यकीय व्यवस्थेवर विनाकारण टीका करू नये, असं आयएमएच्या वकिलानं स्पष्ट केलं.