राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष ‘महायुती’मध्ये सामील होण्यावरून अद्याप अंतिम निर्णय झालेला नसताना महायुतीतील इतर घटक पक्षांकडून मात्र त्याला विरोध होत असल्याचे दिसून आले आहे. राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन काही फायदा होणार नाही, असं स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना आठवले यांनी वरील वक्तव्य केलं आहे.
'राज ठाकरे यांच्याशी माझे काही वैचारिक मतभेद असले तरी ते माझे मित्र आहेत. ते राज्यातील नामवंत नेते आहेत. उत्तम वक्ते आहेत. राज्यात मोठ्या सभांचं आयोजन करण्याचं, इव्हेंट मॅनेज करण्याचं चांगलं कसब त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्रात त्यांच्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. परंतु मनसे पक्षाला निवडणुकीत मते मात्र मिळत नाही अशी परिस्खथिती आहे.’ असं रामदास आठवले यांनी सांगितलं.
भाजपप्रणित ‘महायुती’मध्ये शिवसेनेमधून एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अजित पवार, कॉंग्रेसमधून अशोक चव्हाण, बाबा सिद्दिकीसारखे नेते आल्यानंतर आता राज ठाकरे यांची आवश्यकता नाही, असं रामदास आठवले यांनी सांगितले. मात्र जरी राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याचे पक्के झाले तरी आपण महायुतीतून बाहेर पडणार नसल्याचं आठवले म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात महायुतीमध्ये एकही जागा सोडण्यात आलेली नाही. महायुतीत रिपब्लिकन पक्षाला एकही जागा देण्यात आली नसल्याने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले होते. तेव्हा महाराष्ट्रातूनच तुमच्या पक्षाचे नाव आले नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते, असं आठवले यांनी सांगितले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे आधी शरद पवार यांना भेटले. महाविकास आघाडीने जानकरांना माढ्याची जागा देऊ केली. मात्र एका रात्रीत फडणवीस यांनी जानकरांना महायुतीत ओढून घेतले. जानकरांसारखी ट्रिक मी केली असती तर महायुतीत रिपब्लिकन पक्षाला शिर्डी किंवा सोलापूरची जागा नक्की मिळाली असती, असं आठवले म्हणाले.
कॉंग्रेस प्रणित युपीएमध्ये असताना तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत व्यासपीठावर माझाही फोटो असायचा. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत माझा फोटो नसतो, अशी खंत रामदास आठवले यांनी बोलून दाखवली.