varandha ghat closed : रायगड जिल्हा हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील वरंधा घाट हा प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ३० मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहे. या काळात रस्त्याचे दुपदरीकरण, संरक्षण भिंत बांधण्याचे व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ८ एप्रिल ते ३० मे पर्यंत हा घाट रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडी किमी ८८/१०० (राजेवाडी) ते किमी ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम संरक्षण भिंती बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्यासाठीची कामे सध्या सुरू आहेत. वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम देखील सुरू आहे. हे काम पूर्ण झालेले नाही. या घाटात खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रुंदीचे काम करणे गरजेचे आहे.
सध्या या घाटात हे दुहेरी करणाचे काम सुरू आहे. यामुळे जर या ठिकाणी जर वाहतूक सुरू राहिली तर अपघात होण्याची शक्यता असल्याने आणि पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. या मार्गावर जर वाहतूक सुरू राहिली तर वेळेत हे काम पूर्ण करणे शक्य होणार नाही. त्यामुळे वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आली आली आहे. या बाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे.
हा घाट ३० मे पर्यंत बंद राहणार असल्याने येथील वाहतूक हि पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगांव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे व पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर" असा मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.