Health Care: मुंबईतील टाटा हॉस्पिटल कर्करोगावर उपचार (cancer treatment) करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भारताच्या विविध भागांतून रुग्ण येतात. आर्थिक परस्थितीमुळे आणि अन्य कारणांमुळे अनेकदा या रुग्णांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना मुंबईत राहायला जागा मिळत नाही. याच दरम्यान नुकतंच बरेचशे कॅन्सरचे रुग्ण, अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सापडलेले दिसले. नुकतंच बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईमुळे उपचारासाठी आलेल्या कर्करोगाच्या रुग्णांनी राहायचं कुठे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एस आर एम फाउंडेशनच्या संचालक/ विश्वस्त शमिका नाडकर्णी सांगतात की, "शहराच्या कल्याणाची जबाबदारी असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) या असुरक्षित रूग्णांवर केवळ फूटपाथ रिकामे करण्यासाठी दबावच टाकला नाही तर त्यांची बॅग आणि खाद्यपदार्थांसह त्यांचे सामान देखील टाकून दिली. अशा पद्धतीची कारवाई न करता यावर योग्य त्या पद्धतीने कारवाई करणे गरजचे आहे. फुटपाथ हे योग्य निवासस्थान नाही हे योग्यच आहे. पण या रूग्णांवर अशा पद्धतीने कारवाई करणे योग्य मानवी प्रतिक्रिया नाही." एस आर एम फाउंडेशनच्या (परेल, मुंबई) वतीने शमिका यांनी म्हणून आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेला योग्य पद्धतीने यावर उपाय योजना करण्याची विनंतीही केली आहे.
त्या पुढे म्हणाल्या "एसआरएम फाउंडेशन, या कर्करोग रुग्णांना योग्य व सुरक्षित निवास आणि समर्थन प्रदान करण्यासाठी सहयोगी प्रयत्नांच्या गरजेवर भर देत आहोत." या रुग्णांना राहण्यासाठी सरकार पार्किंगच्या उद्देशाने बांधले गेलेले पण जास्त वापर होत नसलेलं बीएमसी पार्किंगमध्ये रुग्णांना राहण्यासाठी सोय केली जाऊ शकते. असेही शमिका नाडकर्णी सुचवतात.