मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे भाजपच्या वाटेवर? म्हणाले, शक्य तितकी जोखीम घ्या!

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे भाजपच्या वाटेवर? म्हणाले, शक्य तितकी जोखीम घ्या!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 12, 2023 12:53 PM IST

Satyajeet Tambe Tweet : महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी केलेल्या एका सूचक ट्वीटमुळं सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Satyajeet Tambe
Satyajeet Tambe

Satyajeet Tambe : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं केलेल्या नव्या ट्वीटमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तर, काँग्रेस पक्षात संभ्रम निर्माण झालं आहे. सत्यजीत तांबे हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून आहे. त्यांच्या सूचक ट्वीटमुळं हा संभ्रम अधिकच वाढला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यात सध्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा माहौल आहे. राज्यातील प्रमुख पक्षांनी काही मतदारसंघातून आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर, काही मतदारसंघांमध्ये राजकीय डावपेच सुरू आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघातून भाजपनं अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसनं महाविकास आघाडीच्या वतीनं विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. खरंतर, या जागेसाठी काँग्रेसकडून सत्यजीत तांबे हे उत्सुक होते. मात्र, पक्षानं त्यांना संधी दिली नाही. त्यामुळं ते भाजपकडून लढण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं.

सत्यजीत तांबे पक्षात आल्यास त्यांना तिकीट देण्याची तयारी भाजपनं केल्याचंही बोललं जातं. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत तांबे यांच्यावर आमची नजर असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी ते वक्तव्य एक मिश्किल टिप्पणी म्हणून घेतलं गेलं होतं. मात्र, त्यामागे पुढील गणितं होती असं आता बोललं जाऊ लागलं आहे. सत्यजीत यांचं आजचं ट्वीट या शंकाकुशंकांना बळ देणारं आहे.

'शक्य तितकी जोखीम घ्या. जिंकलात, तर नेतृत्व कराल. हरलात, तर मार्गदर्शन कराल,' हे विवेकानंद यांचं वाक्य सत्यजीत तांबे यांनी ट्वीट केलं आहे. हे वाक्य मी हृदयाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलं आहे. विद्यार्थी संघटनेत कार्यरत असल्यापासून विवेकानंद मला नेहमी प्रेरित करत आले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्य आजच्या परिस्थितीशी जोडून पाहिलं जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग