मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई ते अलिबाग अवघ्या २० मिनिटांत; टोल भरायला थांबायचीही गरज नाही!

मुंबई ते अलिबाग अवघ्या २० मिनिटांत; टोल भरायला थांबायचीही गरज नाही!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 12, 2023 02:32 PM IST

Mumbai Trans Harbour Link : मुंबईकरांचं आवडीचं पर्यटनाचं ठिकाण असलेल्या अलिबागला आता अवघ्या १५ ते २० मिनिटांत पोहोचता येणार आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde reviews Mumbai Trans Harbour Link Project : मुंबई ते अलिबाग असा नित्यनेमानं प्रवास करणाऱ्यांबरोबरच पर्यटकांसाठी खूशखबर आहे. आता मुंबई ते अलिबाग हा प्रवास अवघ्या २० मिनिटांत करता येणार आहे. हे शक्य करणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचं काम ९० टक्के काम पूर्ण झालं असून येत्या नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ही माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील १८० मीटर लांब आणि सुमारे २३०० मेट्रिक टन वजनाच्या ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेकची (Orthotropic Steel Deck) उभारणी करण्यात आली. संपूर्ण प्रकल्पांतर्गत समुद्रात उभरण्यात येणाऱ्या एकूण ७० ऑर्थोोट्रॉपिक स्टिल डेक स्पॅन पैकी आतापर्यंत एकूण ३६ स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे.

हा सागरी महामार्ग पूर्णपणे पर्यावरणपूरक असून बांधकामातील जागतिक दर्जाचं तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या महामार्गावर टोल भरण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नसणार आहे. ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला हा देशातील पहिला मार्ग आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आहे काय?

मुंबई ट्रांस हर्बर लिंक (MTHL) हा मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणारा सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका) पूल आहे. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे १६.५ किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत या प्रकल्पाचं काम सुरू आहे. मुख्य पुलाची रचना ही ६० मीटर लांबीच्या स्पॅनची असून मुख्यतः ते सेगमेंटल बॉक्स गर्डर व कॉक्रिट डेक आहेत. या प्रकल्पाचं प्रमुख वैशिष्ट्य सागरी क्षेत्रातील नॅव्हिगेशन भागातील स्टील डेक हे आहे. तांत्रिक भाषेत यास ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (OSD) असं म्हणतात. समुद्रातील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मोठ्या लांबीचे हे स्पॅन समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे २५ मीटर उंच बांधण्यात येत आहेत. त्यामुळं हा स्पॅन नेव्हिगेशनल स्पॅन म्हणून ओळखला जातो.

IPL_Entry_Point

विभाग