इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ५३ वा सामना आज (५ मे) चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सीएसकेने पंजाबला २८ धावांनी पराभव केला.
धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमान पंजाब संघासमोर विजयासाठी १६८ धावांचे लक्ष्य होते, ज्याचा पाठलाग करताना पंजाबचा संघ ९ बाद १३९ धावाच करू शकला.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली सीएसकेचा चालू मोसमातील ११ सामन्यांतील हा सहावा विजय आहे. त्यांनी गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जचा ११ सामन्यांतील हा सातवा पराभव ठरला.
चेन्नई सुपर किंग्जच्या विजयाचा हिरो अष्टपैलू कामगिरी करणारा रवींद्र जडेजा ठरला. जडेजाने फलंदाजीत ४३ धावा केल्या आणि त्यानंतर ३ बळीही घेतले.
१६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही कारण पीबीकेएसने ९ धावांतच २ मोठे विकेट गमावले होते. पंजाबकडून सर्वाधिक धावा प्रभसिमरन सिंगने केल्या.त्याने २४ चेंडूत ३० धावा केल्या आणि आपल्या डावात २ चौकार आणि २ षटकारही लगावले.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात जॉनी बेअरस्टो, रिले रौसो आणि सॅम करन फलंदाजीत अपयशी ठरले. आयपीएल २२०२४ मध्ये पंजाब किंग्जचा हिरो शशांक सिंगने २० चेंडूत २७ धावा केल्या, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
पंजाब किंग्जने पॉवरप्ले ओव्हर्समध्ये २ गडी गमावून ४७ धावा केल्या. शशांक सिंग आणि प्रभासिमरन यांच्या ५१ धावांच्या भागीदारीमुळे संघाने सामन्यात पुनरागमन केले होते. पण ८व्या षटकात शशांक २७ धावा करून बाद झाला आणि इथून पंजाबची खरी घसरण सुरू झाली. यानंतर पंजाब किंग्जने अवघ्या १६ धावांत ५ विकेट गमावल्या. यासह १३ षटकांत संघाची धावसंख्या ७ गडी गमावून ७९ धावा झाली.
१५व्या षटकात हर्षल पटेलही १२ धावा काढून बाद झाला, त्यामुळे पंजाबची धावसंख्या १५ षटकात ९१ धावा झाली. त्यांना अजूनही ५ षटकात ७७ धावांची गरज होती. पण त्यांना या धावा करता आल्या नाही. त्यांचा संपूर्ण डाव २० षटकात १९ बाद १३९ धावांवर संपला.
चेन्नईकडून जडेजा व्यतिरिक्त सिमरजित सिंग आणि तुषार देशपांडे यांनीही शानदार कामगिरी केली. दोन्ही वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने ९ गडी गमावून १६७ धावा केल्या. सीएसकेकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४३ धावा केल्या. जडेजाने २६ चेंडूंच्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकार मारले. कर्णधार ऋतुराज गायकवाडने ३२ आणि डॅरिल मिशेलने ३० धावांचे उपयुक्त योगदान दिले.
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला खातेही उघडता आले नाही आणि तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला हर्षल पटेलने क्लीन बोल्ड केले. पंजाबकडून हर्षल पटेल आणि चहरने प्रत्येकी ३ बळी घेतले. तर अर्शदीप सिंगने २ विकेट मिळविले.
संबंधित बातम्या