Rishabh Pant Penalty IPL 2024 : आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतवर स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. यामुळे तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही.
प्लेऑफच्या दृष्टिकोनातून दिल्लीसाठी हा मोठा धक्का आहे. मंगळवारी (७ मे) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला निर्धारित वेळे संपूर्ण २० षटकं टाकता आली नाहीत. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराला शिक्षा झाली आहे. पंतने यंदा दोनदा स्लो-ओव्हर रेटमुळे लाखो रुपयांचा दंड भरला आहे.
आयपीएलच्या नियमानुसार, संघाचा कर्णधार एखाद्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमध्ये दोषी आढळल्यास त्याला १२ लाख रुपयांचा दंड भरावा लागतो. जर त्याच संघाने दुसऱ्यांदा असे केले तर कर्णधाराला २४ लाख रुपये द्यावे लागले. नियमांनुसार, जर एखाद्या संघाने तिसऱ्यांदा असे केले तर कर्णधाराला ३० लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्याची बंदी घातली जाते.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे केवळ पंतलाच नाही तर संघातील इतर सर्व खेळाडूंना १२ लाख रुपये किंवा मॅच फीच्या ५० टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
येत्या रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना होणार आहे. एकीकडे, DC १२ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, आरसीबीचे सध्या १० गुण आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये ७ व्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील, तर त्यांना पुढचा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल.
जर दिल्लीने विजय मिळवला तर त्यांची टॉप-४ मध्ये येण्याची शक्यता वाढेल, ज्यामुळे RCB प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. पण ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीचा मार्ग सोपा दिसत नाही.