Pune bibvewadi Crime : पुण्यात बिबवेवाडी येथे एका तरुणाने त्याच्या आईच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे लागत असल्याने व आर्थिक अडचणीत असल्याने शेजाऱ्याचे बंद घर फोडून घरातील दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाला अटक केली असून त्याच्यावर बिबेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडून चोरी केलेले सव्वा सात लाख रुपयांचे दागिने देखील जप्त करण्यात आले आहे.
दीपक नामदेव पाटोळे (वय ४१) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शेजाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक हा बेरोजगार आहे. तो व त्याची वृद्ध आई बिबवेवाडीतील एका सोसायटीत राहतात. गेल्या काही महिन्यांपासून तो आर्थिक अडचणीत होता. तर त्याची आई आजारी होती. डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. मात्र, त्यासाठी पैसे लागत होते. ते दीपक जवळ नसल्याने त्याने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शेजाऱ्याच्या बंद फ्लॅटचे कुलूप फोडून दागिने व रोकड लंपास केली होती. दरम्यान, शेजारी त्यांच्या गावावरून परत घरी आल्यावर त्यांना त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा तुटलेला दिसला. त्यांनी या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास केला.
या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला होता. सोसायटीचे आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले. मात्र, याचा उलगडा होत नव्हता. सहा महिन्यांपासून पोलिस आरोपीचा शोध घेत होते. अखेर पोलिसांना आरोपी हा शेजारी राहत असल्याचे कळले. दीपक पाटोळेने शेजाऱ्यांच्या घरात चोरी केल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याचे कबूल केले.
आरोपी दीपक पाटोळेला त्याच्या आईची शस्त्रक्रिया करायची होती. या साठी त्याने त्यांच्या घरातून सव्वा सात लाख रुपए चोरले होते. दरम्यान, चोरलेल्या पैशातून त्याने मोबाइल विकत घेतला. तर घरी टीव्ही देखील घेतला. दीपकच्या राहणीमानात अचानक बदल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे त्याच्यावरील संशय वाढला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याने घरफोडी केल्याचे कबूल केले.
संबंधित बातम्या