Prakash Ambedkar : महाविकास आघाडीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. १५ जागांवर मतभेद असून ते मिटल्यावरच वंचित बहुजन आघाडी महाआघाडीत असणार की नाही ते ठरेल, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर म्हटले आहे. इचलकंरजीत एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर पुन्हा टीकास्त्र डागले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आताचे सरकार हे डाकूंचे सरकार आहे. आधी देवशावर १०० पैकी २४ रुपयांचे असणारे कर्ज या सरकारने ८४ रुपयांवर नेले. गेल्या १० वर्षात हे कर्ज २४ वरून ८४ रुपयांवर नेले आहे. जागतिक बँकेने भारताला इशारा दिला असून जर एखाद्याला १० हजार पगार असला आणि १० हजाराचाच बँकेचा हफ्ता असेल तर तुमची चूल कशी पेटणार.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, पुन्हा जर या सरकारला संधी दिली तर दरवर्षी कर्ज वाढत राहणार आहे. आज ८४ रुपये असलेले कर्ज २०२६ मध्ये १०० रुपयांचे होईल. देशावर कर्जाचा डोंगर उभा करुन मी सन्यास घेतो असे सांगतील. देशाला बुडवून हे सन्यास घेतील. देशाला बुडवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान म्हणून संधी द्यायची का? हे ठरवा, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय.
मोदींच्या सरकारने इथल्या एअरफोर्सची वाट लावली. मनमोहन सिंग सरकारच्या काळात १३५ विमाने फ्रांसकडून विकत घ्यायची होती. सनातन वाल्यांनो सांगा तुम्ही किती विमाने आणली. देशात केवळ ३५ विमान आली, उरलेली १०० कधी येणार, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
जागावाटपाबाबत विचारल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बहुजन आघाडीच्या वाट्याला किती जागा मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय. पण १५ जागांबाबत महाविकास आघाडीत मतभेद असल्याने आम्हाला या भिजत घोंगड्याच्या निर्णयाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत आमच्या बाजूने निर्णय न झाल्यास सर्व ४८ जागा स्वतंत्र लढण्याची तयारी आहे. या निवडणुकीत एमआयएमबरोबर वंचित आघाडी जाणार नाही आणि या निवडणुकीत वंचित-भाजप अशीच खरी लढत होईल, असे त्यांनी सांगितले.