देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून येत्या १५ दिवसांत निवडणूक आयोगाकडून कधीही निवडणुकांची घोषणा केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून आघाड्यांच्या जागा वाटपाबाबत अंतिम वाटाघाटी सुरू आहेत. महायुतीच्या आधी महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्म्यूला ठरला आहे. मुंबईमध्ये पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत तिन्ही पक्षांचे संभाव्य जागावाटप ठरले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुंबईतील घरी सिल्व्हर ओकवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी तिन्ही पक्षांचा संभाव्य फॉर्म्युला ठरला आहे. या बैठकीसाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचे नेते उपस्थितीत होते. या बैठकीमध्ये सर्व विषयावर चर्चा झाली. सर्व नेत्यांच्या सहमतीने महाविकास आघाडीचा फॅार्म्युला ठरला आहे. त्यानुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गट २१ जागा, काँग्रेस १५, राष्ट्रवादी ०९ आणि मित्रपक्षांना ३ जागा सोडण्यात आल्या आहेत. आजच्या बैठकीला वंचितचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.
महाआघाडीच्या बैठकीनंतर काँग्रस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, आजच्या बैठकीत सर्व विषयांवर चर्चा झाली आहे. येत्या १० मार्च रोजी राहुल गांधी महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. त्यावरही चर्चा झाली. समविचारी पक्ष आमच्या सोबत आहेत. निवडून येण्याच्या क्षमतेवर जागावाटप केले आहे. वंचितसोबत अजून चर्चा सुरू आहे. ते नक्कीच आमच्यासोबत येतील. त्याचबरोबर कोल्हापूर मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज यांनी निवडणूक लढवावी, अशी काँग्रेसची इच्छा असल्याचं थोरात म्हणाले.
दरम्यान कालच्या बैठकीत वंचितने मागणी केली होती की, जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी द्यावी. यावर जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, सध्या माझं पूर्ण लक्ष हे मराठा आरक्षणावर आहे. राजकारण हा माझा मार्ग नाही. मराठ्यांची लेकरं मोठी व्हावी, यासाठी माझी झुंज चालू आहे. माझ्यासाठी समाज हा सर्वात मोठा आहे. मी माझ्या समाजासाठी काम करत राहीन, लढत राहीन.
संबंधित बातम्या