वाघाचा दात गळ्यात घातल्याच्या विधानामुळे चर्चेत आलेले बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर दुसऱ्या एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. शेती बळकावल्याच्या आरोपाखाली दिवाणी व फौजदारी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या प्रकरणात आमदार गायकवाड यांच्यासह त्यांचे पुत्र मृत्यूंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात नागपूर येथील रीटा उपाध्याय यांनी राजूर येथील दीड एकर शेतजमीन बळकावल्याचा आरोप केला होता. या महिलेला जिवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आल्याचे समोर आले होते. तिची जमीन बळकावून त्या जमिनीवर आमदार संजय गायकवाड यांनी फार्म हाऊस बांधल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महिलेने आरोप केला होता की, गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याने हे प्रकरण उच्च न्यायायात दाखल करण्यात आले होते. यावर मोताळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानुसार आमदार गायकवाड यांच्यासह मृत्यूंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाड वाघाच्या शिकारीप्रकरणामुळेही चर्चेत आले होते. त्यांची वक्तव्य केले होते की, मी १९८७ मध्ये वाघाची शिकार केली होती व त्याचा दातही गळ्यात असल्याचे म्हटले होते. या प्रकरणात वन विभागाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.