राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कारखान्यावर ईडीने आज जप्तीची कारवाई केली. रोहित पवार यांच्यामागे गेल्याकाही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा ससेमिरासुरू असून आजबारामती अॅग्रो या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली.या कारवाईनंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजपला टोला लगावला आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईची बातमी वाचली आणि विचार आला आता भाजपमध्ये जायला पाहिजे का? असा उपरोधिक सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. ईडीच्या कारवाईवरून हल्लाबोल करताना रोहित पवार म्हणाले की, माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईची बातमी वाचली आणि विचार आला आता भाजपमध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं की, झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू. माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत.
ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय. ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही, असंही रोहित पवार म्हणाले.
अन्य एका ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले की, मी अन्यायाविरोधात बोलतो, आवाज उठवतो म्हणून माझ्यावर कारवाई केली जाते.. ती करायलाही हरकत नाही.. पण ज्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवतो त्यांच्या प्रश्नांवर कधी कारवाई करणार?त्यासाठी कुणी अडवलंय? हिंमत असेल तर बेरोजगारी, पेपरफुटी, महागाई व सरकारी घोटाळे यावरही कारवाई करा, असे म्हटले आहे.
छत्रपती संभाजी नगरमधील कन्नड सहकारी साखर कारखान्यानं राज्य सहकारी मध्यवर्ती बँकेकडून २०१२ साली कर्ज घेतलं होतं. मात्र,आर्थिक डबघाईमुळं कालांतरानं कारखान्याचा लिलाव करण्यात आला. हा कारखाना रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो प्रा. लि. कंपनीनं ५० कोटी रुपयांना खरेदी केला.
रोहित पवारांशी संबंधित कन्नड सहकारी साखर कारखान्यावर कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, ईडीकडून करण्यात आलेली ही कारवाई रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे. ईडीने जप्त केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची किंमत ही सुमारे ५० कोटी २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबरोबरच या प्रकरणामध्ये ईडीने सुमारे १६१ एकर जमीनही जप्त केली आहे.