ED against rohit pawar : रोहित पवारांना ईडीचा धक्का! कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई-ed sealed kannad sugar factory purchased by rohit pawar owned baramati agro ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ED against rohit pawar : रोहित पवारांना ईडीचा धक्का! कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई

ED against rohit pawar : रोहित पवारांना ईडीचा धक्का! कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई

Mar 08, 2024 06:33 PM IST

ED action against Kannad sugar factory : शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीनं खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे.

रोहित पवारांच्या कंपनीनं खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त, ईडीची मोठी कारवाई
रोहित पवारांच्या कंपनीनं खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त, ईडीची मोठी कारवाई (PTI)

ED action against Kannad sugar factory : पक्षात फूट पडल्यानंतरही जोमानं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आखाड्यात उतरलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना धक्का देणारी बातमी आहे. पवारांचे नातू, आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो (Baramati Agro) कंपनीनं खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे.

छत्रपती संभाजी नगरमधील कन्नड सहकारी साखर कारखान्यानं राज्य सहकारी मध्यवर्ती बँकेकडून २०१२ साली कर्ज घेतलं होतं. मात्र, आर्थिक डबघाईमुळं कालांतरानं कारखान्याचा लिलाव करण्यात आला. हा कारखाना रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अ‍ॅग्रो प्रा. लि. कंपनीनं ५० कोटी रुपयांना खरेदी केला. 

बारामती अ‍ॅग्रोबरोबरच हायटेक इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. व अन्य एका कंपनीनं लिलाव प्रक्रियेत भाग घेतला होता. बारामती अ‍ॅग्रो कंपनीनंच २५ ऑगस्ट २०२२ रोजी हायटेक इंजिनीअरिंगला ५ कोटी रुपये दिले होते. त्यानंतर दोन दिवसांनी हायटेक इंजिनीअरिंगनं लिलावात भाग घेतला, असं बँक खात्याच्या तपासणीत आढळून आलं होतं. या प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होता.

बारामती अ‍ॅग्रोनं कारखाना विकत घेण्यासाठी वापरलेले पैसे प्रत्यक्षात खेळत्या भांडवलाची गरज भागवण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या बँकांकडून घेतले होते. मात्र, ते त्यासाठी न वापरता कारखाना खरेदी करण्यासाठी वापरले. बँकेकडून मिळालेल्या पैेसे वळवण्याचा हा प्रकार दिसतो, असा ठपका ईडीनं ठेवला होता.

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सर्वप्रथम गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अनेक दिवस चौकशी होती. याच प्रकरणी ईडीनं रोहित पवार यांची दोनदा चौकशी केली होती. तसंच, बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर ईडीनं छापेही टाकले होते व मनी लाँन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीनं कन्नड सहकारी कारखान्याची जमीन, प्लाण्ट, यंत्रसामग्री आणि साखर युनिटची इमारत जप्त केली आहे.

Whats_app_banner