लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. मुंबईतील हॉटेल फोर सिझन्स येथे ही बैठक झाली. या बैठकीमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांची नाराजी पुन्हा दिसून आली आहे. मी आघाडीसोबत आहे पण आघाडी माझ्यासोबत नसल्याचे दिसत आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी माध्यमांना सांगितले आहे.
या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे देखील उपस्थित होते. त्यांनी बैठकीतील चर्चेविषयी माहिती दिली आहे.
मोकळे यांनी सांगितलं की, प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आघाडी व्हावी आणि ती शेवटपर्यंत टिकून राहावी, यासाठी हवं असेल तर मी अकोल्याची जागाही सोडायला तयार आहे. आधीपासून जे मुद्दे चर्चेत आहेत तेच महाविकासआघाडीच्या आजच्या बैठकीतही चर्चा केली गेली.
महाआघाडीने जरांगेंबद्दल भूमिका स्पष्ट केली नाही. ४८ पैकी १५ उमेदवार ओबीसी समाजातील असावेत, या मागणीवरही चर्चा झाली नाही. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे ३ उमेदवार असावेत, यावरही चर्चा झाली नाही. तसेच भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढत आहे. त्या भाजपसोबत निवडणुकीच्याआधी किंवा निवडणुकीनंतर युती करणार नाही, असे लेखी वचन घटक पक्षांनी द्यावे, असाही प्रस्ताव दिला होता. त्यावरही चर्चा झाली नाही.
‘पहिल्या बैठकीपासून आम्ही सांगतोय की किती जागा देणार ते सांगा, पण अद्याप आजच्या बैठकीपर्यंत जागा वाटपाची चर्चा करण्यात आली नाही, असे सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.