मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभेची जागा शाहू महाराज लढवणार, महायुतीपुढं मोठं आव्हान

Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभेची जागा शाहू महाराज लढवणार, महायुतीपुढं मोठं आव्हान

Mar 06, 2024 05:57 PM IST

Kolhapur Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीनं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जवळपास निश्चित केला आहे. राजघराण्याचे वंशज छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) हे इथून काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर निवडणूक लढणार आहेत.

Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचं नाव निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचं नाव निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

Kolhapur Lok Sabha Election 2024 : 'अब की बार, चारसौ पार' म्हणत भाजपनं पुन्हा एकदा लोकसभेची जोरदार तयारी केली असली तरी त्यांना महाराष्ट्रातून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीनंही (Maha Vikas Aghadi) लोकसभा निवडणूक ताकदीनं लढण्याची तयारी केली असून प्रबळ उमेदवार निश्चित केले आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराजांचं (Shahu Maharaj) नाव जवळपास निश्चित झालं आहे. महायुती आता तिथं कोणाला उतरवणार याबाबत उत्सुकता आहे. 

महाविकास आघाडीच्या नेत्यांची गेल्या काही दिवसांपासून शाहू महाराजांशी चर्चा सुरू होती. आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडं होता. शाहू महाराजांनी काँग्रेसकडून लढण्याची तयारी दाखवल्यामुळं पेच निर्माण झाला होता. त्यावर बरीच चर्चा सुरू होती. कोल्हापूरची जागा काँग्रेसला देऊन त्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यावर आघाडीत एकमत झाल्याचं बोललं जातं. त्यामुळं शाहू महाराज इथून काँग्रेसच्या तिकीटावर लढणार हे जवळपास नक्की झालं आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

संभाजीराजे यांनी दिला दुजोरा

शाहू महाराजांचे चिरंजीव व राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी या वृत्तास अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. 'सर्वच पक्षांना शाहू महाराज हवे होते. आता त्यांनी तयारी दाखवली आहे. आमच्या संघटनेचा त्यांना पाठिंबा असेल. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही १ हजार टक्के कष्ट करू. शाहू महाराजांचा अभ्यास दांडगा आहे. ते कोल्हापूरला वेगळी दिशा दाखवतील, असा विश्वास संभाजीराजे यांनी व्यक्त केला.

कोण आहेत कोल्हापूरचे विद्यमान खासदार?

कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. मागच्या काही वर्षांत इथं ठाकरेंच्या शिवसेनेनंही चांगलं बस्तान बसवलं आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेनं इथं संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांचा मोठ्या फरकानं पराभव करून ते निवडून आले होते. कालांतरानं धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर, शिवसेनेतील फुटीनंतर संजय मंडलिक यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाला मिळाल्यास आगामी निवडणुकीत संजय मंडलिक हेच महायुतीचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. ते शाहू महाराजांना कशी टक्कर देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

WhatsApp channel