मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : ‘बजरंग दलावर बंदी घालण्याची हिंमत कुणाच्या बापात नाही’, फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Devendra Fadnavis : ‘बजरंग दलावर बंदी घालण्याची हिंमत कुणाच्या बापात नाही’, फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 04, 2023 04:35 PM IST

devendra fadnavis live : कर्नाटक विधानसभेच्या प्रचारार्थ आयोजित भाजपाच्या सभेतून फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis (Chandrakant Paddhane)

devendra fadnavis in karnataka : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. सत्ता आल्यास कर्नाटकात बजरंग दलावर बंदी घालण्यात येणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी जाहीर केलं आहे. याशिवाय या मागणीचा काँग्रेसने पक्षाच्या जाहीरनाम्यातही समावेश केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील प्रचारसभेतून प्रत्युत्तर देत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटकात बजरंग दलावर बंदी घालायला कुणाच्या बापात हिंमत नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कर्नाटकातील बेळगावात भाजपाची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकातील अनेक काँग्रेसचे नेते आताच मुख्यमंत्री झाल्यासारखे वागायला लागले आहे. काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला ते मुख्यमंत्री झाल्याचं वाटत आहे. त्यामुळं आता त्यांचे अनेक नेते विविध समाजांचा अपमान करत सुटले आहे. त्यांची मजल आता तर बजरंग दलावर बंदी घालण्याची मागणी करण्यापर्यंत पोहचली आहे. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी लक्षात ठेवावं, कर्नाटकात बजरंग दलावर बंदी घालण्याची हिंमत कुणाच्या बापात नाहीये, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची हिंमत केली होती. परंतु त्यानंतर त्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. काँग्रेसच्या नेत्यांनी कितीही आदळआपट केली तरी ते कर्नाटकात सत्तेत येणार नाहीयेत, परंतु बजरंग दलाच्या बंदीची मागणी करून काँग्रेस कुणाचं लांगुलचालन करत आहे?, काँग्रेसचे नेते हिंदुत्त्वाचा द्वेष करतात का?, या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या नेत्यांनी द्यावीत, असं आव्हानही फडणवीसांनी काँग्रेसला दिलं आहे.

IPL_Entry_Point