मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : मुख्यमंत्री म्हणून मी काय केलं ते जगजाहीर आहे; पवारांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांचं उत्तर

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री म्हणून मी काय केलं ते जगजाहीर आहे; पवारांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांचं उत्तर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 04, 2023 02:51 PM IST

Uddhav Thackeray Reply to Sharad Pawar : शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

Sharad Pawar - Uddhav Thackeray
Sharad Pawar - Uddhav Thackeray

Uddhav Thackeray Reply to Sharad Pawar : 'महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी काय केलं ते जगजाहीर आहे. त्यावर मला अधिक बोलायचं नाही,' अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

शरद पवार यांच्या जीवनावरील 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचं प्रकाशन नुकतंच झालं. त्यात शरद पवार यांनी अनेक राजकीय गौप्यस्फोट केले आहेत. विविध पक्षांबद्दलची आपली मतं मांडली आहेत. महाविकास आघाडीतील आपला मित्र पक्ष शिवसेना व त्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी भाष्य केलं आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

‘उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात केवळ दोनदा जाणं आम्हाला पटण्यासारखं नव्हतं. ठाकरे मुख्यमंत्री शिवसेनेतच वादळ निर्माण होईल याचा अंदाज आम्हाला नव्हता. संघर्ष न करताच त्यांनी मुख्यमंत्री पद सोडायला नको होतं,’ असंही पवार यांनी आत्मचरित्रात म्हटलं आहे.

'मातोश्री' निवासस्थानी आज झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यावर बोलतील अशी अपेक्षा होती. उद्धव ठाकरे यांनी सविस्तर बोलणं टाळलं. मात्र, मंत्रालयात जाण्याबद्दलच्या पवारांच्या टिप्पणीवर त्यांनी बोचरं भाष्य केलं. ‘आत्मचरित्र लिहिण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मुख्यमंत्री म्हणून मी केलेलं काम जगजाहीर आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील प्रत्येकाला मी त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य वाटत होतो. यापेक्षा अधिक मी त्यावर बोलणार नाही,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मुंबईबद्दलच्या भूमिकेवर मी ठाम’

मुंबई तोडण्याचं दिल्लीतील कोणत्याही नेत्याच्या कधीही मनात नव्हतं. त्यामुळं हा विषय आता संपायला हवा, असं मत शरद पवार यांनी पुस्तकात मांडलं आहे. त्याबाबत विचारलं असता, मुंबई विषयीची माझी भूमिका मी नेहमीच ठामपणे मांडलीय आणि मी त्यावर ठाम आहे, यापुढंही राहीन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

IPL_Entry_Point