IPL 2024: मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात काल आयपीएल २०२४ मधील ५५ वा सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईने हैदराबादचा सात विकेट्सने पराभव केला. मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमारने मोक्याच्या क्षणी शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. सूर्यकुमारच्या फलंदाजीसह मुंबईचा अनुभवी गोलंदाज पीयुष चावला आणि हार्दिक पांड्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. हैदराबादविरुद्धच्या विजयासह मुंबईच्या संघाने आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत नवव्या स्थानी झेप घेतली.
दरम्यान हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून आयपीएल २०२४ मध्ये पदार्पण करणाऱ्या २३ वर्षीय अंशुल कंबोजने सर्वांचे मने जिंकली. सोशल मीडियावर या खेळाडूची खूप चर्चा होत आहे. या खेळाडूबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबईकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अंशुल कंबोजने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात उत्कष्ट अशी गोलंदाजी केली. त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच आयपीएल सामन्यात चार षटकात ४१ धावा खर्च करून एक विकेट पटकावली. गोलंदाजांसाठी ही काही विशेष कामगिरी नाही. पण अंशुलची एसआरएचविरुद्ध मैदानावरची कामगिरी सर्वांसाठी आनंदाचे कारण ठरले.
अंशुलने आपल्या पहिल्याच सामन्यात सध्या घातक फॉर्मात असलेल्या ट्रॅव्हिस हेडसारख्या फलंदाजाला बाद केले. मात्र, हा नो बॉल असल्याने ट्रेव्हिस हेडला जीवनदान मिळाले.
यानंतर कंबोजने पुन्हा एकदा ट्रेव्हिस हेडला आपल्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी नुवान तुषाराच्या हातातून चेंडू निसटला. याच षटकात त्याने मयांक अग्रवालला बाद केले. कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात कंबोजने दाखवलेल्या प्रदर्शनामुळे मुंबईचे चाहते खूश झाले आहेत.
कंबोज हा डावखुरा गोलंदाज आहे आणि तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळतो. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कंबोज आतापर्यंत १३ क्रिकेट सामने खेळले आहेत. ज्यात त्याने २४ विकेट्स आणि २८४ धावा केल्या आहेत.
अंशुल कंबोजने २०२२ मध्ये हरियाणाकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने टी-२० क्रिकेटमधील ९ सामन्यात ११ विकेट घेतले आहेत. परंतु, रणजी ट्रॉफीमध्ये त्याने उत्कृष्ट अशी कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या हंगामातील १० सामन्यात त्याने १७ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट फक्त ३.५८ होता. यानंतर आयपीएलच्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला २० लाखांत संघात सहभागी करून घेतले.