IPL 2024: आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत ५५ सामने खेळले गेले. लवकरच साखळी सामने संपतील. यानंतर प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होईल. मात्र, आयपीएलचा यंदाचा हंगाम अनेक दिग्गजांसाठी शेवटचा आयपीएल ठरू शकतो. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे, ज्यात चेन्नई सुपरकिंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक आणि रविचंद्रन अश्विनसह यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे.
महेंद्रसिंग धोनी ४२ वर्षांचा आहे. सध्या धोनी दुखापतीशी झुंजत आहे. यामुळे यंदाचा आयपीएलचा हंगाम धोनीसाठी शेवटचा ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिनेश कार्तिक, इशांत शर्मा, डेव्हिड वॉर्नर, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे आणि ऋद्धिमान साहा अनुक्रमे ३८, ३५, ३७, ३५, ३४ आणि ३९ वर्षांचे आहेत. या हंगामानंतर हे दिग्गज आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत, असे जवळपास निश्चित आहे.
या यादीत मोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि विजय शंकर यांचा समावेश आहे. त्यांच्या फिटनेसशिवाय हे खेळाडू सतत खराब फॉर्मशी झगडत असतात. या हंगामानंतर हे दिग्गज आयपीएलला अलविदा म्हणू शकतात, असे मानले जात आहे. मोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि विजय शंकर हे अनुक्रमे ३५, ३७ आणि ३३ वर्षांचे आहेत. त्यामुळे हे दिग्गज खेळाडू कदाचित पुढील हंगामात आयपीएलचा भाग नसण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत कोलकाताचा संघ पहिल्या स्थानावर आहे. कोलकाताने आतापर्यंत ११ पैकी आठ सामन्यात विजय मिळवला आहे. कोलकाताचा संघ १६ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. राजस्थानचा संघ १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानने १० पैकी आठ सामने जिंकले आहेत. तर, चेन्नई सुपरकिंग्जचा संघ १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. यानंतर सनरायझर्स हैदराबाद (१२ गुण), लखनौ सुपर जायंट्स (१२ गुण), दिल्ली कॅपिटल्स (१० गुण), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (८ गुण), पंजाब किंग्ज (८ गुण), मुंबई इंडियन्स (८ गुण) आणि गुजरात टायटन्स (८ गुण) अनुक्रमे चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहे.