मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar Resignation : ‘कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणार नाही’, शरद पवारांचं सूचक विधान

Sharad Pawar Resignation : ‘कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणार नाही’, शरद पवारांचं सूचक विधान

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 04, 2023 04:48 PM IST

sharad pawar resignation : पुढील दोन दिवसांत राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर विचार केला जाणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं आहे.

sharad pawar retirement
sharad pawar retirement (HT_PRINT)

sharad pawar retirement : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद सोडून सार्वजनिक जीवनात सक्रिय होण्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. परंतु आता राष्ट्रवादीतील अनेक जेष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या या निर्णयाला विरोध करत निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आता खुद्द शरद पवारांनी कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत निवृत्तीच्या निर्णयाचा फेरविचार केला जाणार असल्याचंही शरद पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता शरद पवार निवृत्तीचा निर्णय कायम ठेवणार की निर्णय बदलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. त्यावर शरद पवारांनी आज भाष्य करताना म्हटलं की, मी निर्णय घेण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी बोलायला हवं होतं. परंतु कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतला असता असता तर मला परवानगी मिळाली नसती. त्यामुळं पुढील एक ते दोन दिवसांत मी निवृत्तीबाबतचा योग्य तो निर्णय घेणार आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. याशिवाय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी विनंती केली होती. पवारांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यामुळं आता पुढील दोन दिवसांत शरद पवार कोणता निर्णय घेणार, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

IPL_Entry_Point